असाही एक आदर्श! अनोळखी व्यक्तीने वाचवले तरुणाचे प्राण

अपघात झाल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या अनोळखी व्यक्तीने एका तरुणाचा जीव वाचवल्याची घटना घडल्याने एक आदर्श निर्माण होणार आहे.

Avatar Gupta

असाही एक आदर्श! अनोळखी व्यक्तीने वाचवले तरुणाचे प्राण

अपघातातील व्यक्तीला दिला मदतीचा हात, अपघातग्रस्त युवकाच्या कुटुंबाची म्हातारपणाची काठी वाचली

'हिट अँड रन' प्रकरणात निष्पाप व्यक्तीचा जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातदेखील अशा ताज्या घटना आहेत. पुण्यातील पोर्शे प्रकरण आणि पिंपळे गुरवमधील दुचाकी चालकाला फरपटत गेल्याची घटना ताजी आहे. अपघातानंतर मदतीला कोणी नसल्याने अपघातग्रस्त नागरिकाचा जिवाला धोका असतो. अशा घटना आपण रोज वाचतो अन् पाहतो आहोत. मात्र, अशाच एका प्रकरणात अपघात झाल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या अनोळखी व्यक्तीने एका तरुणाचा जीव वाचवल्याची घटना घडल्याने एक आदर्श निर्माण होणार आहे. या घटनेत केवळ एक जीवच नव्हे तर, एक संपूर्ण कुटुंब मोठ्या धक्क्यातून सावरले आहे. या अपघातानंतर दोन अनोळखी व्यक्तींचा संपर्क जडला अन् तो आजही मैत्रीरुपी अखंड टिकून आहे.

याबाबत माहिती अशी की, गेल्या वर्षी म्हणजेच ११ ऑगस्ट २०२३ मध्ये नेहमीप्रमाणे केविन डॅनी हा २२ वर्षांचा तरुण महाविद्यालयासाठी दुचाकीवरून निघाला होता. मेट्रो स्थानकाकडे जाताना चिंचवड स्टेशन येथील भूमिगत पुलाखाली त्याच्या दुचाकीला अपघात झाला.  भरधाव ट्रकने थांबलेल्या दुचाकीला धडक दिली होती.  तो अपघात एवढा भीषण होता की, त्या तरुणाच्या डोक्याला गंभीर इजा झाली. अपघातानंतर संपूर्ण वाहतूक या मार्गावर खोळंबली होती. दरम्यान, तेथून जाणारे उद्योजक अवतार गुप्ता यांनी आपली मोटार थांबवली. तरुणाच्या डोक्यातून रक्त येत असल्याने त्यांनी कोणतीही पर्वा न करता त्याला आपल्या मोटारीमधून तातडीने रुग्णालयात नेले. योगायोगाने डी. वाय. पाटील रुग्णालयातील कर्मचारीही मदतीला धावून आला होता. ती वेळ अशी होती की, केविनवर तत्काळ उपचार होणे गरजेचे होते. कारण, डोक्याला गंभीर इजा झाल्याने परिस्थिती क्रिटिकल झाली होती. मात्र, संबंधित मोटरमालकाचे प्रसंगावधान आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने तो मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला.

दरम्यान, याची माहिती संबंधित तरुणाच्या कुटुंबाला कळल्यानंतर त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. अगदी मृत्यूच्या दारात असलेल्या आपल्या मुलाला पाहून कुटुंब थबकले.  कुटुंबाचे भविष्य आणि म्हातारपणाची काठी असलेला धडधाकट तरुणाच्या जिवावर बेतले होते. दीर्घ उपचारानंतर केविनच्या प्रकृतीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली. गेले सहा महिने तो अंथरुणावर होता. मात्र, या सर्व गोष्टींवर मात करून तो आपले पुढचे शिक्षण पूर्ण करत आहे.  

आजही तो क्षण आठवल्यानंतर अंगावर शहारे येतात. दिवस भराभरा पुढे गेले. आजही अपघाताची स्थिती आठवल्यानंतर रडू कोसळते, अशी माहिती त्या तरुणाचे वडील डॅनी आयसक यांनी सांगितले. तसेच त्यानंतर हेल्मेटचीही गरज लक्षात आली. त्यामुळे इथून पुढे आपल्या मुलालाच नव्हे तर प्रत्येकाला हेल्मेट घालण्याबाबत ते आग्रही असतात. एका अनोळखी माणसाने एका व्यक्तीचा जीवच नाही वाचवला तर, त्यामागे असलेले कुटुंब देखील वाचवले आहे. नाहीतर मोठा हादरा बसला असता, असे सांगताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

अनोळखी व्यक्ती अन् आयुष्यभराची घट्ट मैत्री

अपघात झाल्यानंतर अवतार गुप्ता या व्यक्तीने मला अक्षरशः उचलून आपल्या गाडीतून उपचारासाठी नेले. ही कृती करताना त्यांनी कसलाच विचार केला नाही. त्यांची ही कृती, मदत एकाचा जीव वाचण्यास कारणीभूत ठरली. कोणतीही ओळख नसताना एक व्यक्ती मदतीला धावून आला. तेव्हापासून या अनोळखी व्यक्तीची मैत्री झाली आहे. ती आजही तेवढीच टिकून असल्याचे केविन म्हणाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story