PUNE: ‘हॉटेलवर चला... साहेबांना खुश करा’; महापालिका अधिकाऱ्यांकडून महिलेच्या लैंगिक शोषणाचा प्रयत्न?

पुणे : महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारीत काम करणाऱ्या एका महिलेचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. पिडीत महिलेला तिच्या लैंगिक अवयवांवरून सातत्याने अश्लील शेरेबाजी व संभाषण करून फोनवरुन शारिरीक संबंधांची मागणी करण्यात आली.

‘हॉटेलवर चला... साहेबांना खुश करा’; महापालिका अधिकाऱ्यांकडून महिलेच्या लैंगिक शोषणाचा प्रयत्न?

पिडीत महिलेने दाखल केली तक्रार : सहकारनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे : महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारीत काम करणाऱ्या एका महिलेचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. पिडीत महिलेला तिच्या लैंगिक अवयवांवरून सातत्याने अश्लील शेरेबाजी व संभाषण करून फोनवरुन शारिरीक संबंधांची मागणी करण्यात आली. तसेच, हॉटेलवर येण्याची आणि साहेबांना खुश करण्याची जबरदस्ती करण्यात आली. पिडीत महिलेने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून सहकारनगर पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १९ एप्रिल २०२४ ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत घडली. या प्रकारामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. 

रोहिदास फुंदे (वय अंदाजे ५०, रा. चव्हाणनगर), दिनेश सोनावणे (वय ४०) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर भादवि ३५४, ३५४ (अ), ३५४ (ड), ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार पद्मावती येथील एका आरोग्य कोठीवर घडला. सहकारनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला महापालिकेत चतुर्थ श्रेणी कामगार असून स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते. तर, आरोपी फुंदे हा मोकादम आहे. सोनावणे हा आरोग्य निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) आहे. पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पिडीत महिला पद्मावती येथील एका आरोग्य कोठीवर नेमणुकीस आहे. तर, आरोपी फुंदे हा त्या आरोग्य कोठीचा मोकादम आहे. तर, या विभागाचा आरोग्य निरीक्षक म्हणून सोनावणे याच्याकडे जबाबदारी आहे. 

पिडीत महिलेने काही कारणास्तव बदली कामगार लावलेला होता. मोकादम फुंदे याने याविषयी आक्षेप घेतला. या महिलेला त्याने एकटे गाठले. तिला ‘तुम्ही तुमचे सफाईचे काम करण्यासाठी हाताखाली माणूस लावलाय. त्याला कशाला पैसे देताय? त्याच्या बदल्यात हॉटेलवर चल. साहेबांना खुश कर आणि बसून पगार घ्या.’ असे म्हणत शारीरिक संबंधांची मागणी केली. तसेच, या महिलेला तिच्या शारीरिक अवयव व शारीरिक ठेवणीवरुन अश्लील शेरेबाजी देखील केली. तिला ‘तुमची फिगर छान आहे’ असे म्हणत लैंगिक अवयवांचे अश्लील वर्णन केले.  तसेच, तिच्या गुप्तांगाला आणि अन्य लैंगिक अवयवांना जाता येता सतत हात लावून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिला वारंवार फोन करून लकडे दवाखान्याजवळ बोलावून घेतले. तिला ‘तुझ्या घरी कोणी नसेल तर मला घरात घेऊन चल. मला तुझ्यासोबत झोपायची इच्छा झाली आहे.’ असे म्हणत तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला. 

त्यानंतर त्याने त्याच्या मोबाईलवरुन आरोग्य निरीक्षक दिनेश सोनावणे याला फोन केला. हा फोन जबरदस्तीने फिर्यादी महिलेकडे बोलण्यास दिला. त्यावेळी सोनावणे याने  महिलेला ‘चला... हॉटेलवरती कधी येताय? तुमच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होत आहे.’ असे म्हणत तिच्याशी अश्लील संभाषण केले. अशा प्रकारे दोघांनी देखील तिच्याशी अश्लील संवाद साधत आणि अश्लील स्पर्श करीत विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत महिलेने कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, की पिडीत महिलेने याबाबतची तक्रार दाखल केली आहे. आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना कलम ४१ अंतर्गत तपासासाठी हजर राहण्याची नोटीस दिली आहे. घडलेला प्रकार गंभीर असून त्याचा तपास केला जात आहे. याठिकाणी काम करणाऱ्या अन्य महिलांशी देखील संवाद साधला जाणार असल्याचे उपनिरीक्षक साळुंखे म्हणाल्या.

याविषयी महापालिकेचे धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम म्हणाले, की याविषयी पालिकेमार्फत योग्य ती खात्यांतर्गत कारवाई केली जाईल. याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून आदेश घेऊन पुढील कारवाई केली जाईल. 

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

संवेदनशील असलेले हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालिकेचे काही अधिकारी या विषयी मोकादम आणि आरोग्य निरीक्षक यांची पाठराखण करीत आहेत. हे प्रकरण मिटवून घेण्याचा प्रयत्न देखील सुरू करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest