रागातून मित्राची गाडी पेटविण्यास गेला आणि अख्खे पार्किंग पेटले

मित्रांसोबत भांडण झाल्याने त्याच्यावरचा राग काढण्यासाठी गाडी पेटवायला गेला आणि भलत्याच गाड्या पेटवून त्या भस्मसात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एक चारचाकी आणि अन्य दुचाकी वाहनांचे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. वडगाव-खुर्द येथील लगडमळ्यात असलेल्या मियामी सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sat, 10 Jun 2023
  • 12:12 am
राग एकावर अन् आग इतरांवर

रागातून मित्राची गाडी पेटविण्यास गेला आणि अख्खे पार्किंग पेटले

रागातून मित्राची गाडी जाळण्यासाठी गेला आणि अख्खे पार्किंग पेटले

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

मित्रांसोबत भांडण झाल्याने त्याच्यावरचा राग काढण्यासाठी गाडी पेटवायला गेला आणि भलत्याच गाड्या पेटवून त्या भस्मसात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एक चारचाकी आणि अन्य दुचाकी वाहनांचे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. वडगाव-खुर्द येथील लगडमळ्यात असलेल्या मियामी सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी महेंद्र भिरुड (रा. लगडमळा वडगाव-खुर्द सिंहगड रोड) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासत पोलिसांनी गाड्या पेटवणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मियामी सोसायटीमधील ए-२ या इमारतीमधील लिफ्ट जवळ सोसायटीचे सार्वजनिक पार्किंग आहे. त्याठिकाणी रात्री येथील सर्व गाड्या उभ्या केलेल्या असतात. याच सोसायटीमधील एका मुलाचे आणि गाड्या पेटवणाऱ्या अल्पवयीन मुलाचे किरकोळ कारणावरून भांडण झाले होते.  भांडणाचा राग आल्याने मित्राचा बदला घेऊन धडा शिकवण्यासाठी त्याने मित्राच्या गाडीला  आग लावण्याचे ठरवले. मित्राची गाडी रात्रीच्या वेळी कोणत्या ठिकाणी लावली जाते याची त्याने पाहणी केली. त्यावेळी त्याला तेथील पार्किंगमध्ये गाडी लावल्याचे समजले. गुरुवार, ८ जून रोजी पहाटे १ वाजून २८ मिनिटांनी तो सोसायटीमध्ये आला. येताना सोबत त्याने प्लॅस्टिकच्या  पिशवीतून ज्वलनशील पदार्थ आणला होता. ते पदार्थ वाहनांवर टाकून काडीपेटीने आग लावली. गाड्यांना आग लावून तो पसार झाला.  

या आगीत वाहने जळून खाक झाली आहेत. त्यामध्ये २ मोपेड दुचाकी, एक एन्फिल्ड बुलेट आणि एक चारचाकी ही वाहने होती. सोसायटीमधील महेंद्र भिरुड यांनी हा प्रकार कोणी केला हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्यांना एक अनोळखी मुलगा आढळला. त्याने फिकट गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला असून तो गाड्या पेटवत असल्याचे आढळून आले. भिरुड यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४३५ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार एखाद्याने अग्नी किंवा स्फोटक पदार्थाने जाळले किंवा पेटवले तर त्याला सात वर्षाची कारावासाची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. गुन्हा दाखल करून घेताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी आरोपी अल्पवयीन असल्याचे समजले.  

पोलिसांच्या माहितीनुसार सोसायटीमधील एकूण २ लाख ५० हजारांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. अल्पवयीन आरोपी हा टवाळ आणि वाईट प्रवृत्तीच्या मुलांमध्ये असतो. त्यातून त्याने हे कृत्य केले असण्याची शक्यता आहे. शुक्रवारी, ९ जून रोजी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार विशाल गवळी करत आहेत.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest