अल्पवयातील धार्मिक कट्टरता ते ‘आयसिस’ची दहशतवादी; पुण्याच्या तरुणीचा भारतविरोधी कट रचण्यापर्यंतचा धक्कादायक प्रवास

सुशिक्षित मुस्लीम कुटुंबात राहणारी एक मुलगी वयाच्या अवघ्या १४-१५ व्या वर्षी सोशल मीडियाद्वारे कट्टरवादी विचारांच्या संपर्कात आली. ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेकडे ओढा वाढला. तिला पाकिस्तानात बसून ‘ऑपरेट’ करणाऱ्या तरुणाने श्रीलंकेसह देशातील विविध भागातील तरुणांच्या एका ग्रुपमध्ये सहभागी केले.

सादिया शेख

आई पुणे महापालिकेत अधिकारी... वडीलदेखील नोकरदार... मावशी डॉक्टर... मामा आयटी इंजिनियर... अशा सुखवस्तू आणि सुशिक्षित मुस्लीम कुटुंबात राहणारी एक मुलगी वयाच्या अवघ्या १४-१५ व्या वर्षी सोशल मीडियाद्वारे कट्टरवादी विचारांच्या संपर्कात आली. ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेकडे ओढा वाढला. तिला पाकिस्तानात बसून ‘ऑपरेट’ करणाऱ्या तरुणाने श्रीलंकेसह देशातील विविध भागातील तरुणांच्या एका ग्रुपमध्ये सहभागी केले. 

गुप्तचर यंत्रणांची तिच्यावर नजर पडली आणि ही माहिती एटीएसला दिली गेली. एटीएसने काही मौलानांच्या मदतीने तिचे मनपरिवर्तन (डी-रॅडिकलायझेशन) केले.  मात्र, ती पुन्हा ‘आयसिस’च्या संपर्कात आली. २०१८ मध्ये तिला गुप्तचर यंत्रणांनी काश्मीरमध्ये ताब्यात घेतले. तिला पुण्यात पालकांच्या हवाली करण्यात आले. त्यानंतर, यंत्रणांच्या डोळ्यात धूळ झोकत शांत न बसता तिने पुन्हा देशविघातक कारवाया सुरूच ठेवल्या. २०२० मध्ये तिला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आणि देशभरातील १०० ठिकाणी नियोजित करण्यात आलेला घातपाती कारवायांचा कट उघडकीस आणला. तिच्यासह पाच जणांना दिल्लीमधील एनआयएच्या विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. पोलीस, एटीएस आणि गुप्तचर यंत्रणांच्या प्रयत्नांनंतरही ती दहशतवादी बनलीच...

कट्टर धार्मिक अल्पवयीन मुलगी ते आयसिस’ची दहशतवादी, असा धक्कादायक प्रवास करणाऱ्या पुण्यातील  तरुणाचे नाव आहे सादिया अन्वर शेख. २५ वर्षीय सादिया (वय २५, रा. विश्रांतवाडी) असे या तरुणीचे नाव आहे. तिच्यासह पुण्यातील नबील एस. खत्री (रा. कोंढवा) यालाही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. सादियाआई-वडील उच्च शिक्षित आणि उत्तम नोकरीत होते. या दोघांमध्ये कौटुंबिक वाद होते. त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर सादियाला घेऊन तिची आई मामाच्या घरी राहण्यास गेली. तिचा मामा आयटी कंपनीत नोकरीला होता, तर मावशी डॉक्टर होती. ती बंडगार्डन रस्त्यावरील एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत शिकत होती. साधारणपणे नववीमध्ये असताना ती सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आयसिस’च्या संपर्कात आली. दहावीत असताना ती आयसिसच्या कट्टरवादी विचारांनी प्रभावित झाली. तिच्या वागणुकीत आणि पेहरावात कमालीचा बदल झाला. ती धार्मिक बाबतीत अधिक रुची दाखवू लागली.

सादिया ही सोशल मीडिया आणि इंटरनेटद्वारे श्रीलंकेतील आयसिस एजंटच्या संपर्कात आली होती. तिला ‘आयसिस’च्या  फेसबुक पेज, ट्विटर, टेलिग्राम ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले होते. श्रीलंका, फिलिपाइन्स, इंग्लंड, सौदी अरेबिया, दुबई, केनिया, युरोपियन देशांसह भारतातील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर, कर्नाटक राज्यातील २०० तरुण-तरुणींच्या ग्रुपमध्येही ती सहभागी झाली होती. या ग्रुपद्वारे त्यांना हिंसक कारवायांसाठी तयार केले जात होते. त्यामधूनच तिने  ‘सुसाइड बॉम्बर’ बनण्याची तयारी केली होती.

केंद्रीय तपास यंत्रणांनी राजस्थानात कारवाई करीत ‘आयसिस’च्या संपर्कातील अभियांत्रिकीच्या तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे केलेल्या तपासामधून सादियाची माहिती यंत्रणांना मिळाली होती. ही माहिती केंद्रीय यंत्रणांनी एटीएसला दिली होती. एटीएसच्या पथकाने राजस्थानात जाऊन त्याच्याकडे चौकशी केली होती. त्यानंतर या मुलीला ताब्यात घेण्यात आले होते. तिच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली होती. तिनेदेखील न घाबरता पोलिसांना उत्तरे दिली होती. दरम्यान, पोलिसांना ती अल्पवयीन असल्याने गुन्हा दाखल करता येत नव्हता. त्यामुळे तिचे पालक आणि काही मौलवी बोलावून तिचे मनपरिवर्तन करण्यात आले होते. त्यावेळी तिने कोणतेही देशविघातक कृत्य न करण्याची हमी दिली होती.

दरम्यान, २०१८ मध्ये सादिया अधिक सक्रिय झाली. त्यावेळी ती दहशतवादी आणि अल कायदाच्या काश्मीर युनिटचा प्रमुख झाकीर मुसासोबत लग्न करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेली होती. त्याच्या पुलवामा येथील त्रालमधील नूरपोरा गावात राहिली होती. तिला सीरियामध्ये मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. दरम्यान, मुसा याने लग्नाला नकार दिल्यानंतर तिने जम्मू-काश्मीरचा आयसिसचा प्रमुख असलेल्या वकार याला लग्नासाठी विचारणा केली होती. ती काश्मीरमध्ये गेल्यानंतर गुप्तचर यंत्रणांना तिची माहिती मिळाली. तिला श्रीनगरला परत येण्यापूर्वीच ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली होती.

पुणे पोलिसांना आणि एटीएसला याबाबत माहिती कळविण्यात आली. यंत्रणांनी कुटुंबीयांकडे चौकशी केली. मात्र, त्यांनी सादिया शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याचे सांगितले होते. या तरुणीकडे चौकशी करून तिची समजूत काढून तिला सोडून देण्यात आले होते. दरम्यान, तिच्यावर यंत्रणांनी बारीक लक्षदेखील ठेवायला सुरुवात केली होती.

त्यानंतरदेखील सादिया ‘आयसिस’साठी काम करीतच होती. अन्य दहशतवादी संघटनांशी संपर्कात राहून त्यांच्याकडून शस्त्र व स्फोटके मिळवण्याचा प्रयत्न करीत होती. तसेच, या दहशतवादी संघटनांना ‘आयसिस’च्या नेतृत्वाखाली एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत होती. तिचे टेलिग्राम अकाऊंट पोलिसांनी उघडून त्याचा तपास केला होता. त्यामधील चॅटिंग पोलिसांनी मिळवले होते.  ती टेलिग्राम ॲपवर ‘अहले वाफा’ नावाने वावरत होती. ती ‘आयसिस’साठी काम करणाऱ्या काश्मिरी दाम्पत्य असलेल्या हिना बेग, जहानजैब आणि डॉ. अब्दुर बसित रहमान यांच्या सातत्याने संपर्कात होती. हिना, सादिया, जहानजैब आणि डॉ. अब्दुर बसित हे तिघेही इस्लामिक स्टेटसाठी 'व्हॉइस ऑफ इंडिया' नावाचे मासिक काढायचे. ते ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’च्या मुद्द्यांवर सरकारच्या विरोधात मजकूर प्रकाशित करायचे. तसेच, याविषयी आंदोलन उभे करण्यामागे मोठी भूमिका बजावत होते.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मार्च २०२० मध्ये जहानजैब, हिना बेग यांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सादियाला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे डॉ. अब्दुर बसितला अटक करण्यात आली. तसेच, पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या नबीललाही अटक करण्यात आली होती. हा तपास नंतर एनआयएकडे गेला. त्यांनी तपास करीत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.  या प्रकरणी विशेष न्यायालयाने जहानजैबला विविध कलमान्वये दोषी ठरवत २० वर्षांची शिक्षा आणि द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली. तर, त्याची पत्नी हिना बेग हिला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सादिया शेखला सात वर्षे, तसेच नबील खत्री याला आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. डॉ. अब्दुर यालाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest