येरवडा कारागृहात कैद्यांकडून पोलीस हवालदारावर हल्ला; फ्रॅक्चर होईपर्यंत केली बेदम मारहाण

पुणे : येरवडा कारागृहात भिंत पाडून त्या ठिकाणी नवी यंत्रणा बसविण्याचे काम सुरू असताना कैद्यांना त्या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तरी देखील या ठिकाणी जाणाऱ्या कैद्यांना हटकल्याच्या कारणावरून एका पोलीस हवालदाराला चार कैद्यांनी बेदम मारहाण केली.

संग्रहित छायाचित्र

पुणे : येरवडा कारागृहात (Yerwada Jail) भिंत पाडून त्या ठिकाणी नवी यंत्रणा बसविण्याचे काम सुरू असताना कैद्यांना त्या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तरी देखील या ठिकाणी जाणाऱ्या कैद्यांना हटकल्याच्या कारणावरून एका पोलीस हवालदाराला चार कैद्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहाच्या नवीन गेट जवळ घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपूर्व संजय खंडागळे, सुरज नारायण आडागळे, आनंद उर्फ सोनू सिद्धेश्वर धड, नीरज लक्ष्मण ढवळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार नानासाहेब रामचंद्र मारणे (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानासाहेब मारणे हे येरवडा कारागृहात नेमणुकीस आहेत. येरवडा कारागृहाच्या सी जे विभागात ते नेमणुकीस होते. या ठिकाणी नवीन यंत्रणा बसविण्यासाठी भिंत पाडून नवीन बांधकाम करण्यात येत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दगड पसरलेले आहेत. बांधकामातील दगड अंगावर पडण्याची शक्यता असल्यामुळे कोणालाही दुखापत होऊ नये म्हणून या ठिकाणी कैद्यांना येऊ देऊ नका असे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आलेले आहेत.

या ठिकाणी मारणे आपले कर्तव्य बजावत असताना आरोपी खंडागळे, अडागळे, धड, ढवळे हे त्या ठिकाणी जात होते. त्यांना या ठिकाणी जाऊ नका अशा सूचना मारणे यांनी केल्या आणि त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. मारणे यांच्या हातातील शासकीय लाठी हिसकावून घेतली आणि त्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या डाव्या डोळ्याच्या वर, डोक्याला, डाव्या हातावर आणि उजव्या हाताच्या बोटांवर गंभीर मार लागला. तसेच, त्यांच्या डाव्या हाताचे मनगट फ्रॅक्चर झाले आहे. त्यानंतर, आरोपींनी त्यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest