पुणे: स्कीन केअर सेंटरमध्ये राजरोस बनवेगिरी!

पुणे: अनेक स्कीन केअर सेंटरमध्ये हायड्रा फेशियल, लेझर उपचार बनावट डॉक्टर, अपात्र व्यक्तींकडून चालवले जात असून अशा केंद्रांवर आता धडक कारवाई करण्याचा निर्णय महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) घेतला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 2 Aug 2024
  • 10:23 am
skin care center, fake doctors, Maharashtra Medical Council, Hydra facial, laser treatment, Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

शहरातील केंद्रात बनावट डॉक्टर, अपात्र व्यक्ती करतात लेझर, हायड्रा फेशियल, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा कारवाईचा निर्णय

नोझिया सय्यद: 

पुणे: अनेक स्कीन केअर सेंटरमध्ये हायड्रा फेशियल, लेझर उपचार बनावट डॉक्टर, अपात्र व्यक्तींकडून चालवले जात असून अशा केंद्रांवर आता धडक कारवाई करण्याचा निर्णय महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)  घेतला आहे. ही स्कीन केअर सेंटर पुण्यातच नव्हे तर राज्यभर पसरली आहेत. यामुळे एमएमसी’ने नॅशनल मेडिकल कौन्सिल (एनएमसी) ला देखील या सेंटरच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी सतर्क केले आहे.

आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अनेक जण लेझर शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारतात. या भीषण वास्तवाबद्दल बोलताना, एमएमसीचे विद्यमान अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले, सध्या यातील अनेक केंद्रे वैद्यकीय पदवी नसलेल्या व्यक्तींद्वारे चालवली जातात. खरं तर, तथाकथित त्वचा केंद्रे, पार्लर आणि स्पा ज्या प्रकारच्या प्रक्रिया करतात, त्या केवळ त्वचातज्ज्ञ किंवा प्लास्टिक सर्जननेच केल्या पाहिजेत. ही केंद्रे केवळ पुणे आणि मुंबईपुरती मर्यादित राहिली नसून राज्यभरात सर्वत्र यांचे पेव फुटले आहे. आज कुणीही उठून अशा प्रकारची सेवा देणारी केंद्रे उघडत आहेत आणि कुठलीही पात्रता नसताना त्वचेवर उपचार करत आहेत. 

खासकरून 'कॉस्मेटिक' किंवा सौंदर्य संवर्धनाशी संबंधित आहेत. हे पूर्णपणे चुकीचे आहे. याबाबत आम्ही आता पुणे महापालिकेला पत्र लिहिले आहे. राष्ट्रीय प्राधिकरणाने अयोग्य आणि बोगस व्यक्तींद्वारे चालवल्या जाणाऱ्या या तथाकथित सौंदर्य केंद्रांवर अंकुश ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा एक प्रकारचा उघड गुन्हाच असल्याचे सांगत ते म्हणाले, सौंदर्याच्या नावाखाली युवती-महिलांची दिशाभूल करणारी फसवी केंद्रे आहेत. त्यांच्या चालकांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की हायड्रा फेशियल आणि इतर अशा प्रकारच्या सौंदर्य प्रक्रिया केवळ नोंदणीकृत त्वचाशास्त्रज्ञ किंवा प्लास्टिक सर्जनद्वारेच केल्या पाहिजेत. शस्त्रक्रियेदरम्यान उद्भवू शकणाऱ्या गंभीर गुंतागुंतीमुळे ब्यूटी सलून किंवा अशा केंद्रांना या प्रक्रिया करण्याची परवानगी नाही.”

एफडीए अंधारातच
याबाबत विचारले असता, अन्न-औषध प्रशासनाचे (ड्रग) पुण्याचे आयुक्त गिरीश हुकरे यांनी याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले, उलट त्यांनीच ‘सीविक मिरर’ प्रतिनिधीला विचारले की, या संदर्भात त्यांना काही माहिती मिळू शकेल काय, एफडीएची उदासिन वृत्ती आणि जागरुकतेचा अभाव यावर या प्रसंगाने जणू शिक्कामोर्तबच केले आहे.

प्लास्टिक सर्जनचे ताशेरे
दुर्मीळ शस्त्रक्रियांविषयी ओळखले जाणारे पुण्यातील ज्येष्ठ प्लास्टिक सर्जन डॉ. सुमित सक्सेना यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, असे उपचार देणारी अनेक सलून आणि दवाखाने त्वरित बंद केली पाहिजेत. पुण्यातील कोरेगाव पार्क, कल्याणीनगर आणि विमाननगरसारख्या उच्चभ्रू किंवा पॉश भाग या बनावट केंद्रांचे हॉटस्पॉट आहेत. या गुन्हेगारांना पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे.”

हेअर सलूनही आता बुटॉक्ससारख्या गुंतागुंतीचे उपचार राजरोसपणे करत आहेत, हे आणखी चिंताजनक आहे. केवळ नोंदणीकृत त्वचातज्ज्ञांनी किंवा सर्जननेच ते केले पाहिज्त. कारण त्यात एका रसायनाचा वापर असून त्याचा गैरवापर किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास ते घातक ठरू शकते.

हायड्रा फेशियलचे गंभीर धोके आणि दुष्परिणाम आणि स्थानिक सौंदर्यशास्त्रज्ञ किंवा ब्यूटी सलूनद्वारे केल्या जाणाऱ्या इतर प्रक्रियांबद्दल विचारले असता सक्सेना यांनी इशारा दिला. ते म्हणाले,  हायड्रा फेशियल हे गोरेपणा आणणारे उपचार नसून स्वच्छता उपचार आहेत. रसायनांचा किंवा अन्य तत्सम उपचारांचा गैरवापर अयोग्य व्यक्तींनी केले तर गंभीर दुष्परिणाम आणि त्वचेच्या घातक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे एमएमसी आणि आरोग्य मंत्रालयाने अशा बोगस केंद्रांचा पर्दाफाश करून दंड आकारण्याची गरज आहे.

खरं तर, एकट्या पुण्यात पाचपैकी एक केंद्र हे कुठलीही वैद्यकीय पात्रता नसलेल्या व्यक्तींकडून चालवले जात आहे. त्यांच्याकडे त्वचारोग स्पेशलायझेशन तर सोडा तर एमबीबीएसची डिग्रीही नाही. त्यांनी कधी काळी त्वचारोग तज्ज्ञांचे मदतनीस म्हणून काम केले आहे आणि याच जोरावर ते केंद्रे चालवत आहेत. हे फार धक्कादायक असून हे प्रकरण गंभीर आहे. यावर तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याची मागणीही सक्सेना यांनी केली.  सक्सेना यांना दुजोरा देताना, रुघवानी यांनी सांगितले की, एमएमसी या बनावट केंद्रांचा पर्दाफाश करण्यासाठी मोठ्या कारवाईची योजना आखत आहे. लवकरच त्वचारोगतज्ज्ञ, प्लास्टिक सर्जन आणि बोगस लोक, बनावट केंद्र कसे ओळखायचे याची स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येतील. 

सोशल मीडिया, रीलद्वारे प्रचार
रुघवानी म्हणाले, एमएमसीने असे निरीक्षण नोंदवले आहे आहे की, स्पा आणि स्कीन सेंटरमध्ये बोगस डॉक्टरांद्वारे डर्माब्रेशन, केमिकल पील्स, लेसर आणि मायक्रोडर्माब्रेशन यासारख्या प्रक्रिया केल्या जात आहेत. याला आळा घालणे आवश्यक आहे. आम्ही हेदेखील पाहिले आहे की, अशा अनेक उपचारांचा सोशल मीडिया आणि रीलद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जातो. कोणताही डॉक्टर रुग्णांना प्रलोभन देण्यासाठी अशा युक्तीचा अवलंब करत नाही. आम्ही आता स्थानिक प्रशासनाला विनंती केली आहे की, त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) सारख्या वैद्यकीय संघटनांना समाविष्ट करावे. त्यामुळे पात्र नसलेल्या व्यक्ती आणि बोगस केंद्रे उघडकीस येतील आणि त्यांच्यावर दंड ठोठावला जाईल. तसेच त्यांना कोर्टात खेचले जाईल.

Share this story

Latest