फटाक्यांमुळे पिंपरी चिंचवडमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली, गर्भवती महिला, नवजात बालक, वृद्धांना जास्त त्रास

दिवाळीतील फटाक्यांच्या अनिर्बंध आतषबाजीमुळे पिंपरी चिंचवडमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली आहे. शहरातील काही ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३०० च्या वर गेल्याने दिल्लीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vikas Shinde
  • Tue, 5 Nov 2024
  • 01:19 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

दिल्लीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती

दिवाळीतील फटाक्यांच्या अनिर्बंध आतषबाजीमुळे पिंपरी चिंचवडमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली आहे. शहरातील काही ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३०० च्या वर गेल्याने दिल्लीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. शहरात शनिवारी सर्वाधिक प्रदूषण नोंदविल्याने ही परिस्थिती चिंताजनक पातळीवर पोहोचली. जागोजागी फटाक्यांचा धूर, वातावरणातील धुरके तसेच बांधकाम प्रकल्पांतून बाहेर पडणाऱ्या धुळीचे साम्राज्यामुळे पिंपरी - चिंचवडमधील हवेची गुणवत्ता पूर्णपणे ढासळू लागली आहे. या प्रदूषित हवेने शहरातील नागरिकांची घुसमट होत असून अनेकांना सर्दी, खोकला, ताप आदी आजारांनी बेजार झाले आहेत.

दिवाळीनिमित्त वाजवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे पिंपरी चिंचवडमधील हवेची गुणवत्ता ढासळू लागली आहे. गुरुवारी ३१ आॅक्टोबरला एकूण हवेची गुणवत्ता 'मध्यम' म्हणून नोंदवण्यात आली. तथापि, शनिवारी अनेक भागात परिस्थिती आणखी वाईट होती, हवेच्या गुणवत्तेची पातळी 'अत्यंत', 'खराब' वर्गीकृत केली आहे.

शहरात प्रदूषणात होणारी वाढ ही मुख्यत: उच्च धूर असलेल्या फटाक्यांच्या वापरामुळे आहे. फटाक्यांमुळे गुरुवारपासून हवेच्या गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम झाला आहे. शुक्रवारपासून आणखी वाढ होऊन फटाक्याच्या हवा आणि ध्वनिप्रदूषणात वाढ झाली आहे. शहरातील निगडी प्राधिकरणाचा काही परिसर वगळता जवळपास सर्व भागांमध्ये धुळीच्या कणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

हवेचा दर्जा निर्देशांक (एक्यूआय) आदर्शपणे १०० च्या खाली असणे आवश्यक आहे. तथापि, दिवाळीच्या या तीन दिवसांमध्ये, शहराच्या विविध भागांमध्ये AQI पातळी ओलांडली आहे. परिणामी दमा आणि हृदयाची समस्या असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. शनिवारी संध्याकाळी, अनेक भागात हवेची गुणवत्ता 'खराब' पर्यंत घसरली.

शहरातील हवेची गुणवत्ता मध्यम स्थिती (१३१) आहे. शहरातील प्रदूषित हवेचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. हवेत तरंगणारे सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकण कान आणि तोंडावाटे सहज शरीरात प्रवेश करतात. त्यातून श्वसनसंस्थेच्या विकाराचा धोका वाढतो. नियमित मास्क वापरल्याने याचा धोका काही अंशी कमी करणे शक्य असते. तसेच काही विषारी वायूचे कणही श्वासाबरोबर शरीरात जातात. त्यातून दीर्घकालीन धोका वाढू लागला आहे.

धनत्रयोदशीच्या दिवसापासूनच मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. दिवाळीत थोडी फार  थंडी जाणवू लागली आहे. त्यात फटाक्यांची अनिर्बंध आतषबाजी झाल्यामुळे हवेची गुणवत्ता खालावली व प्रदूषणाने उच्चांकी पातळी गाठली जाऊ लागली आहे. यंदाच्या दिवाळीला मोठ्या प्रमाणावर फटाके फुटल्याने हवेचा दर्जा गंभीर पातळीपर्यंत खाली घसरला.

ध्वनी आणि वायू प्रदूषणात वाढ

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी ३०० पर्यंत पोहचला आहे, असा दावा पर्यावरणप्रेमी करू लागले आहेत. याचदरम्यान ध्वनिप्रदूषण ८५ डेसिबलच्या सर्वाधिक पातळीवर गेले. पालिकेच्या पर्यावरण विभागाकडून धूलिकणांचे प्रमाण घटल्याचा दावा केला, मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी झाल्याने हवेची गुणवत्ता ढासळली आहे, तर बांधकाम प्रकल्प सुरू असल्याने हवेतील धुळीच्या साम्राज्याचा नागरिकांना त्रास सोसावा लागला.

गर्भवती महिला, नवजात बालक, वृद्धांना जास्त त्रास

ध्वनी निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता आणखी ढासळली. अशा प्रदूषणाचा विशेषत: लहान मुलं, गर्भवती महिला, वृद्ध यांच्यावर जास्त परिणाम होतो. यामुळे श्वसनाच्या समस्या असणाऱ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते. प्रदूषण घातक पातळीवर गेल्यामुळे गर्भवती महिला, अर्भक आणि वृद्ध नागरिकांना याचा प्रचंड त्रास होऊ लागला आहे. तसेच फुप्फुसाचे विकार, दमा आदी आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांची दमछाक होत आहे. शुक्रवारपासून तीन दिवस हवेची गुणवत्ता खालावली आहे. शनिवारी शहरातील आळंदी रोड - ७५० इतक्या सर्वाधिक खराब गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली.

पर्यावरणप्रेमींकडून तपासली हवेची गुणवत्ता

शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून शहरातील विविध भागातील एक्यूआय वॉक हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यानुसार शहराची फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी ३०० पर्यंत पोहोचला आहे, असा दावा पर्यावरणप्रेमी करू लागले आहेत. चिखली, मोशी, आळंदी रोड, मोई फाटा या भागातील हवेची गुणवत्ता किती आहे हे जाणून घेण्यासाठी मोई फाटा ते रिव्हर रेसिडेन्सी असा एक्यूआय वॉक घेण्यात आला. पुण्यातील परिसर संस्था (शर्मिला देव) , ग्रीन विंडो सोल्युशन (प्रशांत राऊळ) व इंद्रायणी जलमित्र (प्रकाश जुकंटवार, जयसिग भाट) सहभागी झाले होते. त्यानुसार एक्यूआय  जो ५० ते १०० असायला पाहिजे होता. पण  मोई फाटा - ३५०,  आळंदी रोड - ७५०,  रिव्हर रेसिडेन्सी रोड - ३५०,  रिव्हर रेसिडेन्सी गेट - ३००,  रिव्हर रेसिडेन्सी गार्डन - २०० अशा प्रकारे हवेची गुणवत्ता दिसून आली आहे.

हिवाळा सुरू होत आहे. या काळात वर्षभराच्या तुलनेने हवेची गुणवत्ता ढासळत असते, तर दिवाळीतील फटाक्यांच्या अनिर्बंध आतषबाजीमुळे पिंपरी चिंचवडमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली आहे. अनेक लोकांना श्वसनाचा त्रास व अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  हवेच्या गुणवत्तेमुळे मानवी शरीरावर व आरोग्यावर काय परिणाम होत आहेत. - प्रशांत राऊळ, ग्रीन आर्मी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest