पुणे : ‘पोर्शे’ अपघाताचे खटले द्रुतगती न्यायालयात; पोलीस आयुक्तांकडून न्यायालयाकडे मागणी
पुणे : कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात यावेत, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. कल्याणीनगरमधील ‘पोर्श’ अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. साधारणपणे ९०० पानांचे हे आरोपपत्र गुरुवार, २५ जुलै रोजी न्यायालयात सादर करण्यात आले होते. या आरोपपत्रामध्ये साधारणपणे ५० पेक्षा अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. यासोबतच सीसीटीव्ही चित्रीकरणासह आरोपींच्या मोबाइलचे विश्लेषण, प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल इत्यादी महत्त्वपूर्ण पुरावे या आरोपपत्रातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केले आहेत. आता हे खटले जलद गतीने चालविण्याची मागणी लवकरच न्यायालयाकडे करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. (2024 Pune Porsche car crash)
यापूर्वी बाल न्याय मंडळाला अल्पवयीन आरोपीबाबतचा साधारण १५० पानांचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर, सविस्तर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून आगामी काही दिवसांत कलम १७३ (८) प्रमाणे आणखी विस्तृत आणि सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल केले जाणार आहे. कल्याणीनगरमध्ये रविवार, १९ मे २०२४ रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भरधाव पोर्शे कारची धडक बसल्यामुळे अनिश अवधीया आणि अश्विनी कोष्टा या दोन आयटी अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आतापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पहिला गुन्हा १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर भादवि ३०४, ३०४ (अ), २७९, ३३८, ३३७, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५, १९९/१७७ अन्वये दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामधील पुराव्यांमध्ये छेडछाड झाल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात भादवि २०१, १२० ब, २१३, २१४, ४६७ या कलमांची वाढ करण्यात आली. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल अगरवाल, ससूनचा फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, सीएमओ डॉ. श्रीहरी हाळनोर, अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली होती.
डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांच्या प्रकरणात भ्रष्टाचार अधिनियम सन १९८८ चे कलम ७, ७(अ), १३ मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५,११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल हिला देखील अटक करण्यात आली होती. या मुलाच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. त्याजागी शिवानी अगरवालचे नमुने घेण्यात आले होते. तसेच, अश्पाक बाशा मकानदार (वय ३६, रा. धानोरी), अमर संतोष गायकवाड (वय २७, रा. सुभाष नगर, नवी खडकी, येरवडा) या दोघांना ससूनच्या डॉक्टरांना पैसे दिल्याच्या आणि पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. अशा प्रकारे या गुन्ह्यात एकूण सात आरोपींवर कारवाई झालेली आहे. या प्रकरणात मूळ साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. यासोबतच सीसीटीव्ही फुटेज, त्याचे तांत्रिक विश्लेषण, घटनास्थळाचा पंचनामा, फॉरेन्सिक लॅबचे अहवाल, क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल, तांत्रिक पुरावे आदींचा यामध्ये समावेश आहे. आता हे सर्व खटले द्रुतगतीने चालविण्याची मागणी लवकरच न्यायालयाकडे करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.