पुणे: कात्रज-कोंढवा रस्त्याला मिळाला निधीचा बूस्टर!

पुणे: रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाला वेग प्राप्त व्हावा यासाठी भूसंपादनाकरता राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाला आहे. तसेच महापालिकेनेही निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी भूसंपादन केले जाणार असून ७१ कोटींच्या निधीला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 1 Aug 2024
  • 01:13 pm

संग्रहित छायाचित्र

स्थायी समितीने दिली ७१ कोटींच्या निधीला मान्यता, ९४ हजार चौरस मीटर क्षेत्राचे भूसंपादन होणार

पुणे: रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाला वेग प्राप्त व्हावा यासाठी भूसंपादनाकरता राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाला आहे. तसेच महापालिकेनेही निधी मंजूर केला आहे. त्यामुळे   या रस्त्यासाठी भूसंपादन केले जाणार असून ७१ कोटींच्या निधीला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे ९४ हजार चौरस मीटर क्षेत्राचे भूसंपादन केले जाणार आहे.

कात्रज-कोंढवा ८४ मीटरच्या डीपी रस्त्याच्या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता देण्यात आली आहे.  हे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे आवश्यक होते. गेल्या चार वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. काम अर्धवट असल्याने रस्त्यावर अपघातांची मालिका सुरु आहे. त्यामुळे रस्त्याचे काम मार्गी लावण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. रस्त्याच्या कामासाठी ३७५ कोटींची गरज आहे. या रस्त्यासाठी पालिकेच्या बजेटमध्ये ७४ कोटी, तर राज्य सरकारकडून १३९ कोटींचा निधी आला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या भूसंपादनासाठी २१३ कोटींचा निधी उपलब्ध आहे. या भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ३० टक्के रक्कम भरण्यासाठी ७१ कोटींचा निधी देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

दक्षिण पुण्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रुंदीकरण करण्यात येणार आहे. पुणे शहराच्या मंजूर विकास योजना आराखड्यामध्ये ८४ मीटर रूंदीचा विकास योजना रस्ता (कात्रज-कोंढवा) दर्शविलेला आहे. कात्रज कोंढवा रस्त्याचे ८४ ऐवजी आता ५० मीटर रुंदीकरण केले जाणार आहे. यामुळे भूसंपादनाचा खर्च २८० कोटी रुपये इतका येणार होता. त्यानुसार २०० कोटी रुपयांची मागणी राज्यसरकारकडे केली होती. मात्र राज्य सरकारने २०० कोटी ऐवजी १३९ कोटी रुपयांच्या निधी महापालिकेच्या खात्यात जमा केला आहे. हा रस्ता राजस सोसायटी ते खडी मशिन चौक ते महापालिका हद्दीतील पिसोळीपर्यंत आहे.

या रस्त्याच्या भूसंपादनासाठी पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये ७४ कोटी रुपयांची तरतूद आहे. राज्य सरकारने रस्त्यासाठी १३९ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या भूसंपादनासाठी २१३ कोटी रुपये निधी उपलब्ध आहे. या रस्त्यासाठी १ लाख ७५ हजार चौरस मीटर क्षेत्र ताब्यात घ्यायचे आहे. त्यापैकी ८ हजार २५० चौरस मीटर क्षेत्राचे भूसंपादन झाले आहे. सद्यस्थितीत ६२ हजार ७०० चौरस मीटर क्षेत्राचे भूसंपादन सुरू आहे. आता ९४ हजार चौरस मीटर क्षेत्राचे भूसंपादन करणे गरजेचे आहे. त्यासाठी ३७५ कोटींची आवश्यकता आहे. या रस्त्याच्या भूसंपादनामुळे कात्रज येथे ५९ मिळकती आणि कोंढवा येथे एकूण ७८ मिळकती बाधित होत आहेत. या रस्त्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी ठेवला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

Share this story

Latest