संग्रहित छायाचित्र
पुणे: केंद्र सरकारच्या योजनेतून महापालिकेच्या हद्दीत आरोग्य सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे शहर आणि समाविष्ट गावांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून १२५ आरोग्यवर्धिनी दवाखाने आणि ५८ आपला दवाखाना सुरू केले जाणार आहेत. महापालिकेच्या हद्दीत २५ ठिकाणी आरोग्यवर्धिनी दवाखान्यांची सेवा सुरु झाली आहे. तर ६० ठिकाणी १५ ऑगस्ट पर्यंत सुरु केले जाणार आहेत. तर उरलेल्या ठिकाणी ही सेवा सुरु होण्यासाठी दिवाळीची वाट नागरिकांना पाहावी लागणार आहे.
केंद्र सरकारच्या योजनेतून शहरात सुमारे १२५ आरोग्यवर्धिनी दवाखाने सुरू होणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून ५८ आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सेवा या सेवा प्रत्यक्षात २६ जानेवारीपर्यंत नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले होते. आरोग्यवर्धिनी दवाखाने आणि आपला दवाखाना उभारण्यासाठी महापालिकेकडून जागा शोधण्यात येत होती. मात्र खासगी ठिकाणी आकारण्यात येणारे भाडे परवडणारे नव्हते. महापालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात ९६ आरोग्य केंद्रे सुरू करण्यासाठी जागेचा शोध सुरू केला होता. त्यानुसार २९ आरोग्य दवाखान्यासाठी महापालिकेला जागा देखील मिळाली होती. तर उर्वरित दवाखान्यांसाठी जागेच शोध घेतला जात होता. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शर्तीचे प्रयत्न केले जात होते. मात्र आता महापालिकेच्याच जागेत ही सेवा सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून १२१ ठिकाणी जागा निश्चित केल्या आहेत. तर राहिलेल्या ४ जागा देखली लवकरच निश्चित केल्या जाणार आहेत. त्यामुळे विधान सभा निवडणूकीपूर्वी दवाखान्यांची सेवा सुरु करण्याचा प्रयत्न महापालिकेचा आहे.
सरकारच्या आदेशानुसार २६ जानेवारीपर्यंत सर्व आरोग्यवर्धिनी दवाखाने व आपला दवाखाने सरु करावे लागणार होते. त्यानुसार योग्य नियोजन केल्याचा दावा प्रशासनाने केला होता. पंरतु महापालिकेच्या आरोग्य विभागात सातत्याने घडामोडी सुरु असल्याने दवाखान्यांच्या जागांचे नियोजन कोलमडले होते.
फायबर कंटेनरचा दवाखान्यासाठी वापर
आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यासाठी महापालिकेला जागा मिळण्यासाठी कसरत करावी लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी महापालिकेच्या प्रशासकीय इमारती नाहीत. तसेच केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत या दवाखान्यांच्या दुरुस्ती व इतर सुविधांसाठी निधी दिला जाणार आहे. या कारणास्तव महापालिकेला कोणतीही जागा भाड्याने घेता येत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही अशा ठिकाणी फायबर कंटेनरचा वापर करुन आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरात फायबर कंटेनरमध्ये असे एकूण ४० दवाखाने सुरू करण्यात येणार आहे.
नवीन केंद्रांसाठी कंत्राटी भरती...
केद्र सरकारच्या आदेशानुसार दवाखाने सुरु करावे लागणार आहेत. या दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज भासणार आहे. आता असणारे मनुष्यबळ आपुरे पडत असल्याने या दवाखान्यांसाठी कर्माचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे कंत्राटी पध्दीतीने भरती केली जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया राबवून प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या केंद्रांवर एक एमबीबीएस डॉक्टर, दोन नर्स, एक ड्रेसर आणि एक फार्मासिस्ट यांची नियुक्ती केली जाणार आहे.