मॉन्सून केरळात येणार तरी कधी?

देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते. त्यांच्याच अंदाजानुसार मॉन्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये पोहचावयास हवा होता. हवामान विभागाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत अरबी समुद्राच्या दक्षिण किनार्‍यावर चक्रीवादळ निर्माण होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 7 Jun 2023
  • 11:35 am
मॉन्सून केरळात येणार तरी कधी?

मॉन्सून केरळात येणार तरी कधी?

अरबी समुद्रात खोलवर चक्रीवादळ निर्माण झाल्याने मॉन्सूनच्या केरळकडील वाटचालीत अडथळे

#नवी दिल्ली

देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते. त्यांच्याच अंदाजानुसार मॉन्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये पोहचावयास हवा होता. हवामान विभागाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत अरबी समुद्राच्या दक्षिण किनार्‍यावर चक्रीवादळ निर्माण होत आहे. यामुळे मॉन्सूनच्या केरळ किनाऱ्याकडील वाटचालीत अडथळे निर्माण झाले आहेत. अद्याप मान्सून केरळातच दाखल झालेला नाही. त्यामुळे मॉन्सून केरळात आणि त्यानंतर देशाच्या अन्य भागात येणार तरी कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सोमवारी सायंकाळी अरबी समुद्रात खोलवर चक्रीवादळ तीव्र झाले. मंगळवार सकाळपर्यंत या चक्रीवादळाचा वेग वाढत गेला आणि वादळ आग्नेय अरबी समुद्रावर येऊन धडकले. हे चक्रीवादळ सध्या गोव्याच्या पश्चिम नैऋत्य किनाऱ्यापासून ९२० कि. मी. अंतरावर आहे.  मुंबईच्या दक्षिण-नैऋत्यपासून ११२० कि. मी. अंतरावर आहे. पोरबंदरच्या दक्षिण भागापासून ११६० कि. मी., तर पाकिस्तानातील दक्षिण कराचीपासून १५२० कि. मी. अंतरावर आहे.

वादळाच्या शक्यतेमुळे उन्हापासून सुटका मिळण्यासाठी पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. खोल अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असून याचा परिणाम केरळात धडकणाऱ्या मान्सूनवर होणार आहे. परिणामी कोकणच्या दिशेने सरकत येणारा मान्सूनही उशिरा होणार आहे.

अरबी समुद्रात खोलवर हे चक्रीवादळ तयार होत असल्याने कोकण किनारपट्टीवर याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. तसेच, चक्रीवादळामुळे येणाऱ्या पावसाचीही शक्यता नाही. परंतु, मच्छिमार बांधवांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

तसेच, ८ ते १० जून दरम्यान कर्नाटक, गोवा-महाराष्ट्राच्या  किनारपट्टी भागात वादळी वाऱ्याचा वेग प्रतिताशी ४०-५० कि. मी. असा असेल. या काळात नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्रावर वेगवान वारे, पाऊस असण्याची  शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे  हवामान विभागाने म्हटले आहे. 

मॉन्सून  साधारणपणे १ जूनच्या सुमारास केरळच्या किनारपट्टीवर दाखल होतो. जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी अजून  मॉन्सून केरळात आलेला नाही. श्रीलंकेतच  मॉन्सून  दहा दिवस विलंबाने आला आहे. लक्षद्विपच्या काही बेटावर मॉन्सूनचे आगमन झाले असले तरी तेथून केरळकडे त्याची प्रगती होण्यासारखे अनुकूल वातावरण निर्माण झालेले नाही.

भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोमा सेनरॉय यांच्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे आता यंदा मॉन्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. मॉन्सून केरळमध्ये दाखल होतो, त्याचवेळी अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे मान्सूनचा प्रवाह थोडासा विस्कळीत झाला आहे. केरळमध्ये मान्सून केव्हा दाखल होईल, याबाबत आता कोणताही अहवाल देऊ शकत नाही.

दुसरीकडे, पूर्व भारतातील राज्यांमध्ये विशेषतः बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये उष्णतेची लाट आली आहे. 

हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार यांच्या माहितीनुसार , जेव्हा तापमान सरासरी ४.५ अंश सेल्सिअसने वाढते तेव्हा ती उष्णतेची लाट मानली जाते. जर तापमान सरासरी ६.५ अंश सेल्सिअसने जास्त असेल, तर ती गंभीर स्थिती मानली जाते. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे. आम्ही बिहार आणि पश्चिम बंगालसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. देशातील बहुतांश भागात मॉन्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे. तथापि, उत्तर-पश्चिम भारतात या वर्षी  मॉन्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी असू शकतो. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest