शांतता करार झाला नाही, तर नागरी वस्त्यांवरही हल्ले करणार
तेहरान : मध्यपूर्वेतील युद्ध आता अत्यंत विनाशकारी वळणावर पोहोचले असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमधील वाकयुद्ध टोकाला गेले आहे. ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम देत ‘संपूर्ण इराण बेचिराख’ करण्याची धमकी दिली आहे. याला इराणनेही जशास तसे उत्तर दिले असून, “अमेरिकेची अवस्था नरकापेक्षाही वाईट करू,” असा इशारा दिला आहे.
ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी देताना म्हटले आहे की, जर इराणने तत्काळ शांतता करार मान्य केला नाही आणि युद्ध थांबवले नाही, तर अमेरिका इराणच्या पायाभूत सुविधांसह नागरी वस्त्यांवरही हल्ले करेल. “येणारा मंगळवार हा इराणसाठी ‘पॉवर प्लांट डे’ आणि ‘ब्रिज डे’ ठरेल. होर्मुझची सामुद्रधुनी तत्काळ खुली करा, अन्यथा तुम्ही नरकात जाल,” अशा कठोर शब्दांत ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. या युद्धात आता आम्ही सामान्य नागरिकांचाही विचार करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केला होता. त्यानंतर हे युद्ध दोन आठवड्यांत संपेल, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र, इराणने दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे हे युद्ध आता पाचव्या आठवड्यात पोहोचले आहे. इराणने प्रत्युत्तरादाखल ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ हा सागरी मार्ग बंद केला आहे. जगातील सुमारे २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गावरून होते. या नाकेबंदीमुळे जागतिक स्तरावर इंधन संकट निर्माण झाले असून, हा संघर्ष आता जागतिक युद्धाच्या छायेखाली उभा ठाकला आहे.
अमेरिकेला इस्रायलची फूस, इराणचा आरोप
इराणच्या संसदेचे स्पीकर मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी अमेरिकेला अधिक गंभीर इशारा दिला आहे. ते म्हणाले, “आमच्या नागरिकांच्या सुरक्षेला बाधा आली, तर आम्ही अमेरिकेची अवस्था नरकाप्रमाणे करून टाकू. तुमच्या देशातील प्रत्येक नागरिकाला आपण नरकात का राहतोय, असे वाटू लागेल.” तसेच, ट्रम्प हे इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या सांगण्यावरून हे सर्व करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सामान्य नागरिकांना लक्ष्य केले, तर…
ट्रम्प यांच्या या धमकीनंतर इराणच्या लष्करी प्रवक्त्याने टेलिग्रामवरून अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. “अमेरिकेने जर आमच्या सामान्य नागरिकांना लक्ष्य केले, तर आम्ही असा विनाशकारी आणि व्यापक हल्ला करू की अमेरिका तो कधीही विसरणार नाही,” असे इराणने म्हटले आहे. इराणच्या सरकारी ब्रॉडकास्टर ‘आयआयआरबी’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेसमोर झुकणार नाही, यावर तेहरान ठाम आहे. या परस्पर धमक्यांमुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे.


