Advertisement

US-israel-iran war | ‘होर्मुझ’च्या चाव्या हरवल्या आहेत, इराणने उडवली अमेरिकेची खिल्ली…

सामुद्रधुनी खुली न केल्यास वीज प्रकल्प उडवण्याची ट्रम्प यांची धमकी

तेहरान : जागतिक तेल पुरवठ्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’वरून अमेरिका आणि इराणमधील तणाव आता एका ऐतिहासिक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेला विनाशकारी अल्टिमेटम आणि त्याला इराणने उपरोधिकपणे दिलेले उत्तर, यामुळे मध्यपूर्वेतील युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत.

ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी तत्काळ खुली करण्याची तंबी दिली होती. ही सामुद्रधुनी खुली न झाल्यास इराणमधील वीज प्रकल्प, पूल आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. मात्र, इराणने या गंभीर धमकीला अत्यंत उपरोधिकपणे उत्तर देत ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे.

झिम्बाब्वेमधील इराणच्या दूतावासाने सोशल मीडियावर म्हटले की, “आम्ही होर्मुझच्या चाव्या हरवल्या आहेत.” तर दक्षिण आफ्रिकेतील इराणच्या मिशनने अधिक चिमटा काढत म्हटले, “शू… चावी कुंडीखाली ठेवली आहे, फक्त मित्रांसाठी उघडा.” इराणच्या या प्रतिक्रियेमुळे अमेरिकन प्रशासन संतापले असून, मुत्सद्दी पातळीवरील हा वाद आता लष्करी कारवाईच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा ऊर्जा मार्ग आहे. जगातील एकूण तेल आणि वायू पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के पुरवठा याच मार्गावरून होतो. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनंतर इराणने या मार्गावर कडक निर्बंध लादले आहेत. यामुळे जागतिक तेल बाजारात टंचाई निर्माण झाली असून, कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ट्रम्प यांनी हा मार्ग लष्करी बळाचा वापर करून खुला करण्याचे संकेत दिले आहेत, तर इराणने नागरी सुविधांवरील हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिली आहे.

युद्धाचा धोका वाढला

सध्या संपूर्ण मध्यपूर्वेत क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचे सत्र सुरू आहे. इस्रायल आणि आखाती देशांमध्येही भीतीचे वातावरण आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला झाल्यास त्याचे परिणाम जागतिक स्तरावर होतील. दुसरीकडे, अमेरिका आपली लष्करी ताकद वाढवत असून, होर्मुझचा मार्ग मोकळा करण्यासाठी मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहे. या दोन महासत्तांमधील वादामुळे आता तिसऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होते की काय, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

इराणमध्ये घुसून केली अमेरिकन वैमानिकाची सुटका

या वाढत्या संघर्षात एक थरारक घटना घडली. अमेरिकेचे एक ‘एफ-१५’ फायटर जेट इराणच्या हद्दीत उडत असताना पाडण्यात आले. या युद्धात अमेरिकेचे लढाऊ विमान नष्ट होण्याची ही पहिलीच घटना आहे. विमानातील मुख्य वैमानिकाची सुटका झाली, मात्र ‘वेपन्स सिस्टम ऑफिसर’ असलेला दुसरा कर्मचारी इराणच्या दुर्गम डोंगराळ भागात अडकला होता.

स्वत:च नष्ट केली खराब विमाने, अमेरिकेचा दावा

इराणी सैन्य त्याचा शोध घेत असताना, अमेरिकन स्पेशल फोर्सने अनेक विमाने आणि प्रगत गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने एक गुप्त मोहीम राबवली. शत्रूच्या प्रदेशात २४ तासांहून अधिक काळ अडकलेल्या या जखमी सैनिकाला अमेरिकेने सुखरूप बाहेर काढले. या मोहिमेदरम्यान काही विमाने खराब झाली, तर इराणच्या हाती प्रगत तंत्रज्ञान लागू नये म्हणून अमेरिकेने स्वतःची काही विमाने तिथेच नष्ट केली. ट्रम्प यांनी या मोहिमेचे वर्णन “अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धाडसी मोहीम” असे केले आहे.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

फिल्टर पाड्याच्या बच्चनची लग्नगाठ...

Next Post

Avimukteshwaranand On Mohan Bhagawat | स्वतः लग्न करा, मुले जन्माला घाला; अविमुक्तेश्वरानंद यांची भागवत यांच्यावर टीका...