राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचे अमेरिकेला थेट आव्हान; वीज प्रकल्पांच्या संरक्षणासाठी ‘मानवी साखळी’ करण्यासाठी घातली देशवासीयांना साद…
तेहरान (दि.७)| पश्चिम आशियातील युद्ध आता एका निर्णायक वळणावर येवून ठेपले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली मुदत (डेडलाईन) संपण्यापूर्वी इराणमध्ये युद्धाची तयारी शिगेला पोहोचली आहे. ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा खुली न केल्यास इराणमधील वीज प्रकल्प आणि महत्त्वाचे पूल उद्ध्वस्त करण्याची धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांनी दिलेली मुदतीच्या पार्श्वभूमीवर, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी “दीड कोटी इराणी नागरिक देशासाठी बलिदान देण्यास तयार आहेत,” असे जाहीर करत अमेरिकेला थेट आव्हान दिले आहे.
ट्रम्प यांनी इराणला मंगळवारी (दि.७) रात्री ८ वाजेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीपर्यंत इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आंतरराष्ट्रीय जहाजांची वाहतूक सुरू न केल्यास इराणच्या पायाभूत सुविधांवर भीषण बॉम्बफेक करण्याचा इशारा दिला आहे. “संपूर्ण देश एका रात्रीत उद्ध्वस्त केला जाऊ शकतो,” असे खळबळजनक विधान ट्रम्प यांनी केले आहे. यापूर्वी अनेकदा मुदत वाढवून दिल्यानंतर, ‘आता अतिरिक्त वेळ संपली आहे,’ असे म्हणत त्यांनी आपल्या आक्रमक भूमिकेचा पुनरुच्चार केला.
अमेरिकेच्या संभाव्य हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी इराणने आता भावनिक आणि धोरणात्मक पवित्रा घेतला आहे. इराणच्या सर्वोच्च युवक परिषदेने देशातील तरुणांना आवाहन केले आहे की, त्यांनी राष्ट्रीय मालमत्ता असलेल्या वीज प्रकल्पांच्या भोवती ‘मानवी साखळी’ तयार करावी. तसेच, आयआरजीसीच्या जनरलनी पालकांना आपली मुले लष्करी चेकपोस्टवर तैनात करण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी स्वतःचे उदाहरण देत म्हटले की, “मी स्वतः आणि कोट्यवधी नागरिक इराणसाठी प्राण अर्पण करण्यास सज्ज आहोत.” इराणच्या नऊ कोटी लोकसंख्येपैकी एक कोटी ४० लाख लोकांनी स्वयंसेवक म्हणून नाव नोंदवल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे.
दरम्यान, सध्या वॉशिंग्टन आणि तेहरानमध्ये पडद्यामागे मुत्सद्दी चर्चा सुरू असली, तरी ट्रम्प यांची डेडलाईन संपायला काहीच तास उरले असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष पश्चिम आशियाकडे लागले आहे. ही डेडलाईन शांतता घेऊन येते की विनाश, याचा फैसला लवकरच होईल.
अमेरिकेचा शांती प्रस्ताव मान्य करुन तडजोड न केल्यास अश्मयुगात पाठवण्याची धमकी देणाऱ्या ट्रम्प यांना आता इराणने जशास तसे चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद-बाघेर गालिबाफ यांचे सल्लागार आणि राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक, मादी मोहम्मदी यांनी ट्रम्प यांच्या धमकीची खिल्ली उडवत त्यांनाच २० तासांच्या आत आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला आहे. मोहम्मदी यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ”खरी परिस्थिती अशी आहे की, ट्रम्प यांच्याकडे आत्मसमर्पण करण्यासाठी २० तासांचा वेळ आहे. अन्यथा इराण अमेरिकेसह त्यांच्या साथीदारांनी अश्मयुगात पाठवेल, आम्ही माघार घेणार नाही.” ट्रम्प यांच्या धमकीला इराणने त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात तेहरानमध्ये १५ नागरिक ठार
मंगळवारी दिवसभर इराण आणि इस्रायलमध्ये क्षेपणास्त्रांचा मारा केला. इराणमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात तेहरानच्या उपनगरात १५ नागरिक ठार झाले आहेत. प्रत्युत्तर म्हणून इराणने सौदी अरेबियावर सात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, जी ऊर्जा प्रकल्पांच्या जवळ पाडण्यात आली. या हल्ल्यांमुळे सौदी अरेबिया आणि बहरीनला जोडणारा २५ किलोमीटर लांबीचा ‘किंग फहाद कॉजवे’ पूल सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे. इस्रायलच्या सैन्याने इराणी नागरिकांना रेल्वे प्रवास टाळण्याचा इशारा दिला असून, रेल्वे नेटवर्कवर मोठे हल्ले होण्याचे संकेत दिले आहेत.
युद्ध गुन्ह्यांची मला अजिबात पर्वा नाही : ट्रम्प
फ्रान्सने या वाढत्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोट यांनी स्पष्ट केले की, नागरी आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करणे हे ‘युद्धाच्या नियमांचे’ आणि ‘आंतरराष्ट्रीय कायद्याचे’ उल्लंघन आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही अमेरिकेला नागरी वस्तीवरील हल्ल्यांपासून परावृत्त होण्याचा इशारा दिला आहे. मात्र, ट्रम्प यांनी “युद्ध गुन्हे घडल्यास त्याची मला अजिबात पर्वा नाही,” असे म्हणत जगाच्या टीकेला केराची टोपली दाखवली आहे.
इराणची कायमस्वरूपी युद्धबंदीची मागणी
जगातील एकूण तेल पुरवठ्याचा २० टक्के वाटा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातो. २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने हा मार्ग रोखून धरला आहे. इराणने ४५ दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळून लावत कायमस्वरूपी युद्धबंदीची मागणी केली आहे.
युद्धात आतापर्यंत झालेली जीवितहानी
इराण : १,९०० हून अधिक मृत्यू
लेबनॉन : १,४०० हून अधिक मृत्यू आणि १० लाखांहून अधिक नागरिक विस्थापित
इस्रायल : २३ नागरिक आणि ११ सैनिक ठार
अमेरिका : १३ लष्करी जवान शहीद


