Baramati By-Election 2026 | बारामती पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत रोहित पवार-हर्षवर्धन सपकाळ यांची भेट; चर्चेंचा तपशील आला समोर....
US-israel-iran war | अखेर ४० दिवसांनी युद्धविराम.! संघर्षाला दोन आठवड्याचा अल्पविराम मात्र ‘त्या’ २ प्रमुख मुद्यांवर मतभेद कायम…
PMC Pune | ओव्हरहेड केबल कारवाईसाठी महापालिकेची समिती...
Advertisement

US-israel-iran war | अखेर ४० दिवसांनी युद्धविराम.! संघर्षाला दोन आठवड्याचा अल्पविराम मात्र ‘त्या’ २ प्रमुख मुद्यांवर मतभेद कायम…

वॉशिंग्टन/तेहरान | जागतिक राजकारणाला आणि अर्थव्यवस्थेला हादरा देणाऱ्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाला अखेर तात्पुरता पूर्णविराम मिळाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी संस्कृती नष्ट करण्याची दिलेली धमकी मागे घेतल्यानंतर, तीनही देशांमध्ये दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर अखेर शिक्कामोर्तब झाले. पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेल्या या करारामुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या असल्या, तरी ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ आणि इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम यांसारख्या कळीच्या मुद्द्यांवरून अद्यापही अनिश्चिततेचे ढग कायम आहेत.

प्रादेशिक युद्ध थांबवण्यासाठी आणि जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा खुली करण्याबाबत उभय पक्षांनी परस्परविरोधी प्रस्ताव मांडले आहेत. इराणने असा पवित्रा घेतला आहे की, या जलमार्गातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाकडून ते कररूपी टोल आकारतील. या शुल्काचा वापर युद्धात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केला जाईल, असे इराणचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, ट्रम्प यांनी शांततेच्या काळातही या जलमार्गावर अमेरिकन युद्धनौका तैनात ठेवण्याचे संकेत दिले आहेत. जागतिक तेल आणि नैसर्गिक वायूच्या एकूण वाहतुकीपैकी २० टक्के वाहतूक या सामुद्रधुनीतून होते. त्यामुळे इराणने शुल्क आकारल्यास आंतरराष्ट्रीय जलमार्गाच्या दशकांच्या परंपरेला धक्का बसेल, अशी भीती आखाती अरब देशांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, युद्धविरामाच्या अटींबाबत खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांमध्ये विसंगती दिसून आली. सुरुवातीला त्यांनी इराणच्या १० कलमी योजनेचे स्वागत केले, पण नंतर या योजनेला ‘फसवणूक’ असे संबोधले. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे पूर्णपणे नष्ट करणे, हेच अमेरिकेचे अंतिम ध्येय असल्याचे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले आहे.

लेबनॉनमध्ये संघर्ष सुरूच राहणार; नेतन्याहू यांचा पवित्रा

दरम्यान, या संपूर्ण युद्धविरामात पाकिस्तानने मुख्य मध्यस्थाची भूमिका बजावली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ संवादानंतरच हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी मान्य केले. पाकिस्तानच्या दाव्यानुसार, या युद्धविरामात लेबनॉनमधील युद्धाचाही समावेश आहे. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. इस्रायलने स्पष्ट केले आहे की, इराणसोबत युद्धविराम झाला असला, तरी लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्धच्या त्यांच्या लष्करी मोहिमा आणि जमिनीवरील कारवाया सुरूच राहतील.

शांतता चर्चेत पाकिस्तानची मध्यस्थी फळाला

इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांना सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सुरुवातीला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांचा उल्लेख ‘माझे प्रिय बंधू’ असा केला आहे. तसेच त्यांनी या प्रदेशातील युद्ध संपवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी अराघची यांची ही पोस्ट ट्रुथ सोशलवर शेअर केली आहे. यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेच्या चर्चेमध्ये पाकिस्तानची मध्यस्थ म्हणून असलेले भूमिका अधोरेखित होते.

तेहरानमध्ये कट्टरपंथीयांकडून तडजोडीचा निषेध

राजकीय स्तरावर करार झाला असला, तरी तेहरानच्या रस्त्यावर चित्र वेगळे आहे. युद्धविरामाची घोषणा होताच सरकार समर्थक निदर्शकांनी ‘अमेरिका मुर्दाबाद’ आणि ‘इस्रायल मुर्दाबाद’ अशा घोषणा देत निदर्शने केली. अमेरिकेसोबतच्या निर्णायक युद्धाची तयारी करणाऱ्या कट्टरपंथीयांनी या तडजोडीचा निषेध करत अमेरिका आणि इस्रायलचे ध्वज जाळले. यामुळे इराणच्या अंतर्गत राजकारणातही या निर्णयावरून संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अर्थव्यवस्थेला दिलासा आणि जीवितहानीचा आकडा

युद्धविरामाच्या घोषणेचा सकारात्मक परिणाम जागतिक बाजारपेठेवर दिसून आला. आशियाई बाजार उघडताच कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आणि शेअर बाजार तेजीत आले. मात्र, या युद्धाने मोठी मानवी किंमत मोजली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, इराणमध्ये १,९०० हून अधिक, तर लेबनॉनमध्ये १,५०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. यामध्ये २३ इस्रायली आणि १३ अमेरिकन सैनिकांचाही समावेश आहे.

तात्पुरता तह की मोठ्या युद्धापूर्वीची विश्राम

शुक्रवारी (दि.१०) पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये या शांतता योजनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी उच्चस्तरीय चर्चा सुरू होणार आहे. दोन आठवड्यांचा हा तात्पुरता तह कायमस्वरूपी शांततेत बदलणार की, हा केवळ मोठ्या युद्धापूर्वीचा विश्राम आहे, याचे उत्तर या चर्चेतून मिळण्याची अपेक्षा आहे. इराणवरील निर्बंध हटवणे, गोठवलेली मालमत्ता मुक्त करणे आणि अमेरिकन फौजांची माघार या इराणच्या मागण्यांवर पाश्चात्य राष्ट्रे काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

इराणने अमेरिकेला दिलेला १० कलमी प्रस्ताव

अहिंसेप्रती कटिबद्धता
होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहणार
युरेनियम संवर्धनास परवानगी
सर्व प्राथमिक निर्बंधांची समाप्ती
सर्व दुय्यम निर्बंधांची समाप्ती
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे
गव्हर्नर्स बोर्डच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे
इराणला नुकसानभरपाई देणे
पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैन्याची माघार
लेबनॉनमधील हिझबुल्लाहविरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविराम

या १० कलमी प्रस्तावानंतर इराण आणि अमेरिकेत यांच्यात युद्धविरामाचा करार झाला.

भारतीयांना तत्काळ इराण सोडण्याचे आदेश

भारतीय दूतावासाने आपल्या नव्या पत्रकात म्हटले आहे की, “इराणमधील सद्यस्थिती आणि अलीकडील घडामोडी पाहता, सर्व भारतीय नागरिकांनी दूतावासाने सुचवलेल्या सुरक्षित मार्गांचा वापर करून लवकरात लवकर इराण सोडावे.” विशेष म्हणजे, कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीमेकडे जाण्यापूर्वी दूतावासाचा सल्ला घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. परस्पर कोणताही निर्णय घेऊन सीमेवर जाण्याचा प्रयत्न करू नका, असेही दूतावासाने स्पष्ट केले आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी दूतावासाने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. समन्वय साधण्यासाठी भारतीय अधिकारी २४ तास संपर्कात असून, नागरिकांनी घाबरून न जाता दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.

मध्यपूर्वेतही सुवर्णकाळ येईल : ट्रम्प

ट्रम्प यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत जागतिक शांततेसाठी हा एक मोठा दिवस असल्याचे म्हटले आहे. ”जागतिक शांततेसाठी हा मोठा दिवस आहे. इराणला आता शांतता हवी आहे, ते संघर्षाला कंटाळले आहेत आणि जगाचीही तीच भावना आहे,” असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. ज्याप्रमाणे अमेरिकेत प्रगतीचे वारे वाहत आहेत, त्याचप्रमाणे आता मध्यपूर्वेतही ‘सुवर्णकाळ’ येईल, असा ठाम विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Baramati By-Election 2026 | बारामती पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत रोहित पवार-हर्षवर्धन सपकाळ यांची भेट; चर्चेंचा तपशील आला समोर....

Next Post

PMC Pune | ओव्हरहेड केबल कारवाईसाठी महापालिकेची समिती...