इराणने टार्गेट केल्यामुळे कोसळलेल्या एफ-१५ ई स्ट्राईक ईगल विमानातील हवाई दलाच्या कंमांडरला वाचवण्याची यशस्वी मोहिम
तेहरान : अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन फोर्सेसने धाडसी मोहीम यशस्वी केली आहे. इराणमध्ये बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याची सुटका करण्याची मोहीम स्पेशल फोर्सेसनं फत्ते करुन दाखवली. या साहसी मोहिमेत सहभागी झालेल्या बचाव पथकातील एक अधिकारी जखमी झाला. त्याला उपचारांसाठी कुवेतला पाठवण्यात आले आहे.
शुक्रवारी इराणनं अमेरिकेचे एफ-१५ ई स्ट्राईक ईगल विमान पाडलं होते. या विमानात असलेल्या दोघांनी योग्य वेळी स्वत:ला इजेक्ट केले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. दोघेही इराणमध्ये सुरक्षित उतरले. यातील पायलटची सुटका अमेरिकेने आधीच केली. पण वेपन्स ऑफिसर शत्रू देशात अडकला. जवळपास एक दिवस तो शत्रू राष्ट्रात लपून राहिला. या कालावधीत इराणी सैन्य त्याचा शोध घेत होते. त्यासाठी जंग जंग पछाडण्यात आले. स्थानिकांना बक्षिसाचे आमिष दाखवण्यात आले.
ज्या भागात एफ-१५ ई विमान कोसळलं, त्या परिसरात सरकारविरोधात रोष आहे. त्यामुळे वेपन अधिकाऱ्याला लपण्यात मदत झाली. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिकन सैन्यानं ताकद पणाला लावली. शेकडो कमांडो या मोहिमेत सहभागी झाले होते. सोबतच डझनभर लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर्स, सायबर अधिकारी, गुप्तचर यंत्रणा यांचा वापर या धाडसी मोहिमेत करण्यात आला.
इराणमध्ये अडकलेला अधिकारी एक बीकन आणि सुरक्षित संवाद उपकरणाच्या माध्यमातून बचाव पथकाच्या संपर्कात होता. अमेरिकी कमांडो अधिकारी त्याच्या सुटकेसाठी पोहोचताच इराणी सैन्यानं तुफान गोळीबार सुरु केला. यानंतर अमेरिकेच्या लढाऊ विमानांमधून अधिकारी लपलेल्या भागाच्या आसपास पोहोचलेल्या इराणी सैन्याच्या ताफ्यांवर बॉम्ब वर्षाव करण्यात आला. इराणी सैन्य अमेरिकन अधिकाऱ्याच्या जवळ पोहोचू नये याची पूर्ण काळजी घेण्यात आली.
या धाडसी मोहिमेदरम्यान अखेरच्या क्षणी बचाव पथकाला एका तांत्रिक समस्येचा सामना करावा लागला. कमांडो आणि अधिकाऱ्याला नेणारी दोन वाहतूक विमानं इराणच्या एका रिमोट बेसवर अडकली. यानंतर कमांडर्सनी तातडीनं निर्णय घेत तीन नवी विमानं तिथे पाठवली. नादुरुस्त झालेली दोन विमानं बॉम्बनं उडवून देण्यात आली. ही विमानं इराणच्या हाती लागू नये याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली. यानंतर सगळ्या सैनिकांना आणि सुटका करण्यात आलेल्या अधिकाऱ्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.
तो कधीही खऱ्या अर्थाने एकटा नव्हता
‘माझ्या अमेरिकन बांधवांनो, गेल्या काही तासांत अमेरिकन सैन्याने अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धाडसी ‘शोध आणि बचाव’ मोहिमांपैकी एक यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आमचे एक विलक्षण क्रू मेंबर अधिकारी, जे एक अत्यंत सन्माननीय कर्नल देखील आहेत, ते आता पूर्णपणे सुरक्षित आहेत हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. हा शूर योद्धा इराणच्या धोकादायक पर्वतरांगांमध्ये शत्रूच्या हद्दीत होता. आमचे शत्रू तासागणिक त्याच्या जवळ पोहोचत होते आणि त्याचा पाठलाग करत होते. परंतु, तो कधीही खऱ्या अर्थाने एकटा नव्हता; कारण त्याचे कमांडर-इन-चीफ, युद्ध सचिव, जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष आणि त्याचे सहकारी योद्धे २४ तास त्याच्या स्थानावर लक्ष ठेवून होते आणि त्याच्या सुटकेसाठी अत्यंत बारकाईने नियोजन करत होते’, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथवर पोस्ट केले आहे..
माझ्या निर्देशानुसार, अमेरिकन सैन्याने त्याला परत आणण्यासाठी जगातील सर्वात प्राणघातक शस्त्रांनी सज्ज असलेली डझनभर विमाने पाठवली. तो जखमी झाला आहे, पण तो लवकरच पूर्णपणे बरा होईल. ही चमत्कारिक बचाव मोहीम कालच्या दुसऱ्या एका शूर वैमानिकाच्या यशस्वी सुटकेनंतर राबवण्यात आली आहे. आमची दुसरी बचाव मोहीम धोक्यात येऊ नये म्हणून आम्ही कालच्या सुटकेच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नव्हता.
–डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका


