संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन: पंजाबमधील खडूरसाहिब मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांच्या शपथविधीला उशीर झाल्याचा मुद्दा आता अमेरिकेतही गाजत आहे. अमेरिकेचे प्रसिद्ध शीख वकील जसप्रीत सिंग यांनी या प्रकरणी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली. या भेटीत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे जसप्रीत यांनी सांगितले. यावर लवकरच तोडगा निघेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. ही बैठक कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस शहरात झाली.
सुमारे तासभर ही बैठक चालली. बैठकीत अमृतपाल सिंग यांच्यासह शिखांशी सर्व संबंधित मुद्दे मांडण्यात आले. जसप्रीत सिंह म्हणाले की, अमृतपाल सिंग यांच्यावर पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने एनएसए लादण्यात आला आहे. ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ते स्वातंत्र्यपूर्व कायद्यांच्या आधारे लादले आहे. जसप्रीत सिंग यांनी हॅरिस यांना सांगितले की, अमृतपाल सिंग यांनी लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला आहे. प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर त्यांच्यावर लादलेल्या एनएसएचा कालावधी एक वर्षासाठी वाढवला. हे प्रकरण ते सातत्याने मांडत आहेत.
अमृतसरपासून ४० किलोमीटर अंतरावरील जल्लूपूर खेडाचा अमृतपाल सिंग वारिस हा पंजाब दे संघटनेचे प्रमुख आहेत. काँग्रेसच्या कुलबीर सिंग झिरा यांचा पराभव करून ते खडूर साहिबमधून विजयी झाले आहेत. अमृतपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली २३ फेब्रुवारी २०२३ रोजी हजारो लोकांचा जमाव अमृतसरमधील अजनाळा पोलीस ठाण्यावर चालून गेला होता. त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. १८ मार्च रोजी अमृतपाल घरातून पळून गेले. २३ एप्रिल रोजी पंजाब पोलिसांनी अमृतपाल यांना मोगा येथे अटक केली. तेव्हापासून अमृतपाल आसाममधील दिब्रुगड तुरुंगात बंद आहेत. खलिस्तानी विचारसरणीला पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला आहे. अमृतपाल यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी तुरुंगाबाहेर येऊ दिले नाही. ४ लाखांहून अधिक मते मिळवत ते विजयी झाले.