पुणेः राज्यातील इ. दहावी-बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या क्रीडागुणांसाठीची कार्यपद्धती अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यात आली. सवलतीच्या गुणांसाठी सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली असून, खेळाडू विद्यार्थ्यांना दर वर्षी १ जानेवारी ते १५ एप्रिल या कालावधीत ऑनलाइनद्वारेच अर्ज सादर करावा लागणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यात क्रीडासंस्कृतीचे संवर्धन आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा धोरण-२०१२ मधील शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी-बारावीच्या खेळाडूंना सवलतीचे गुण देण्याची योजना राबवण्यात येते. या प्रक्रियेत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, विविध क्रीडा संघटनांनी सुचवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ, जलद व पारदर्शक करण्यासाठी आपले सरकार पोर्टलचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासाअंती विद्यार्थ्यांवरील कागदपत्रांचा भार कमी करून ही सेवा हमी कायद्याच्या कक्षेत समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सुधारित प्रक्रियेमध्ये अनावश्यक टप्पे आणि कागदपत्रे कमी करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार ऑनलाइन अर्जातील एकूण फील्ड्स २९ वरून २१ इतकी कमी करण्यात आलेली आहे. आवश्यक असलेली कागदपत्रे ८ वरून ६ करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांचा फोटो, स्वाक्षरी अशी कागदपत्रे, तसेच नाव, पत्ता, जन्मतारीख, शाळेचे नाव, लिंग अशी माहिती विद्यार्थ्याच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावरून आपोआप भरली जाणार आहे. विद्यार्थ्यांकडून दाखल केल्या जाणाऱ्या अर्जांवरील प्रक्रियेसाठी त्रिस्तरीय प्रशासकीय रचना करण्यात आली आहे. क्रीडा अर्जांसाठी महाआयटीतर्फे प्रणाली विकसित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पंधरा दिवसांत प्रक्रिया
क्रीडा गुण देण्याच्या सेवेचा समावेश सेवा हमी कायद्यांतर्गत सेवांमध्ये करण्यात आला आहे. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाइन प्रणालीद्वारेच अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर १५ दिवसांमध्ये या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे, असे नमूद केले आहे.
जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांची शिफारस महत्त्वाची
जिल्हा क्रीडा अधिकारी हे क्रीडागुणांच्या सवलतीसाठी शिफारस करणारे तज्ज्ञ अधिकारी असल्याने यांच्याकडून शिफारस झालेल्या सर्वच प्रस्तावांना विभागीय शिक्षण मंडळाकडून क्रीडा गुण देण्याची कार्यवाही करावी, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची शिफारस महत्त्वाची ठरणार आहे.


