बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना, तत्कालीन गृहमंत्री असादुझ्झमान खान कमाल आणि माजी पोलिस महासंचालक चौधरी अब्दुल्ला अल-मामुन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने सामूहिक हत्या आणि इतर गंभीर आरोप निश्चित केले आहेत. गेल्या वर्षी जुलै-ऑगस्ट दरम्यान झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
आजपासून हसीना यांच्या अनुपस्थितीत या खटल्याच्या सुनावणीला औपचारिक सुरुवात झाली. त्यांच्या सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्यानंतर १० महिन्यांनी या खटल्याचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले. हसीना यांनी आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर केला, आणि त्यामुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाला, असा आरोप लवादाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने केला आहे.
लवादाने हसीना आणि कमाल यांच्याविरोधात नव्याने अटक वॉरंट जारी केले आहे. तिसरे आरोपी अल-मामुन सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. विशेष म्हणजे बांगलादेशच्या इतिहासात प्रथमच आंतरराष्ट्रीय लवादाच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण टेलिव्हिजनवर करण्यात आले.
गेल्या वर्षीच्या या आंदोलनात पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत अंदाजे १,४०० लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हसीना सरकारने मोठ्या प्रमाणावर अटकसत्र राबवले होते. परंतु सरकार पायउतार झाल्यानंतरही हिंसाचार सुरूच राहिला.
या प्रकरणात हसीना सरकारमधील अनेक वरिष्ठ मंत्री, प्रशासकीय अधिकारी आणि सुरक्षा दलांच्या प्रमुखांवरही आरोप ठेवण्यात आले आहेत. मानवाधिकार संघटनांनी या हिंसाचाराची तीव्र नोंद घेतली होती आणि आंतरराष्ट्रीय समुदायानेही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली होती.