संग्रहित छायाचित्र
वाशिंग्टन: भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांची अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांनी अलीकडेच एच- १ बी व्हिसाबाबत केलेल्या विधानामुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात त्यांच्या हकापट्टीसाठी उद्योगपती एलॉन मस्क यांचा दबाव कारणीभूत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनात डीओजीई (डॉज) म्हणजेच सरकारी कार्यक्षमता विभागाची जबाबदारी रामास्वामी यांच्याकडे सोपवली होती. या विभागात अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांचाही समावेश आहे. मस्क यांच्या दबावामुळेच रामास्वामी यांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची चर्चा आहे. रामास्वामी हे बाहेर पडावे यासाठी त्यांच्यावर रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख नेते व मस्क यांचा मोठा दबाव असल्याचे बोलले जात आहे. पॉलिटिकोने दिलेल्या वृत्तानुसार, रामास्वामी यांनी डीओजीईमधून बाहेर पडण्यापूर्वी एक्सवर पोस्ट केली आहे, जिथे त्यांनी अमेरिकेची संस्कृती आणि लोकांना कामावर घेण्याच्या पद्धतींवर टीका केली आहे. त्यात एच-१बी व्हिसाचाही त्यांनी उल्लेख आहे.
ट्रम्प यांच्या निकटवर्तीय रिपब्लिकन नेत्याने सांगितले की, विवेक रामास्वामी यांनी पक्षात परत येण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मस्क नाराज झाले आहेत. त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात येईल अशा चर्चा सुरू होत्या. दरम्यान त्यांनी केलेल्या ट्विटनंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रामास्वामी यांच्या वक्तव्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. काही समीक्षकांचे म्हणणे आहे की, परदेशी कामगारांचे समर्थन करत त्यांनी अमेरिकेतील कामगारांचा अवमान केला आहे, तर काहींनी त्यांच्या मुद्द्याचे समर्थनही केले आहे. खरे तर एच- १ बी हा नॉन इमिग्रंट व्हिसा कार्यक्रम असून ज्याच्या मदतीने अमेरिकन कंपन्या तात्पुरत्या स्वरूपात परदेशी कामगारांना कामावर ठेवतात. या विशेषत: अशा नोकऱ्या आहेत, ज्यासाठी विशेष कौशल्य आणि ज्ञान आवश्यक असते. अमेरिकेत एच-१बी व्हिसाधारकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, डीओजीमधून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी टीमला, ट्रम्प आणि मस्क यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
'डीओजीई'च्या निर्मितीत मदत करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. मला खात्री आहे की, एलॉन आणि त्यांची टीम हे काम चोखपणे करतील. ओहायोमधील माझ्या पुढच्या वाटचालीबद्दल मी लवकरच सांगेन, असे रामास्वामी म्हणाले आहेत. रामास्वामी ओहयोच्या गव्हर्नरपदाची निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत. रविवारी (दि. १९) अनेक माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचे संकेत दिले आहेत. रामास्वामी यांनी यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता, परंतु नंतर त्यांनी या शर्यतीतून माघार घेतली. रामास्वामी हे ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांचे निकटवर्तीय मानले जातात.