संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन: गेल्या वर्षी अमेरिकेत एक खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला अटक करण्यात आली होती. निखिल गुप्ता याला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता गुप्ताने आपल्यावरील सारे आरोप फेटाळत आपण निर्दोष असल्याचे सांगितले. निखिल गुप्ता याला शुक्रवारी (१४ जून) चेक प्रजासत्ताकमधून अमेरिकेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
न्यूयॉर्कमध्ये खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकी सरकारच्या विनंतीनंतर चेक प्रजासत्ताकने निखिल गुप्ताला अटक केली होती. त्याला गेल्या आठवड्यात अमेरिकेत आणण्यात आलं आणि न्यायालयासमोर हजर केलं. गुरपतवंत सिंग पन्नूकडे अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे.
निखील गुप्ताचे वकील जेफरी चाब्रोवे सुनावणीनंतर म्हणाले की, निखिलला सोमवारी न्यूयॉर्कच्या एका फेडरल न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयासमोर निखिलने सांगितलं की, तो निर्दोष आहे. यापूर्वी निखिल गुप्ताने चेक प्रजासत्ताकमधील न्यायालयात आपले अमेरिकेकडे प्रत्यार्पण करू नये अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र तेथल्या न्यायालयाने निखिल गुप्ताची याचिका फेटाळली होती.
अमेरिकेने निखिल गुप्तावर केलेल्या आरोपानुसार तो नाव माहीत नसलेल्या भारतीय सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशांनुसार काम करत होता. दुसऱ्या बाजूला, भारताने हे आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणाशी भारताचा काहीच संबंध नसल्याची भूमिका परराष्ट्र मंत्रालयाने घेतली आहे. मात्र या प्रकरणी उच्चस्तरीय तपासही सुरू केला आहे. गुप्ताचे वकील चाब्रोवे म्हणाले, अमेरिका आणि भारतासाठी हे एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे. मला असं वाटतं की आपण या प्रकरणी संयम बाळगण्याची गरज आहे. आत्ताच कोणताही निष्कर्ष काढू नये. या घटनेची पार्श्वभूमी काय आहे हे तपासले जाईल, न्यायालयासमोर सुनावण्या होतील आणि त्यामुळे या प्रकरणावर प्रकाश पडेल. आम्ही पूर्ण ताकदीने निखिलचा बचाव करू. बाहेरून होत असलेला दबाव जुगारून हे प्रकरण पूर्ण न्यायिक प्रक्रियेने हाताळलं जावं यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
अमेरिकेच्या फेडरल न्यायालयात चालू असलेल्या या खटल्यात निखिल गुप्तावर ठेवलेल्या आरोपानुसार निखिलने एका मारेकऱ्याला कामावर ठेवले होतं. तसेच गुरपतवंत सिंग पन्नूला ठार मारण्यासाठी गुप्ताने त्याला १५ हजार डॉलर आगाऊ दिले होते. गुप्ता यांनी हे आरोप फेटाळले आहेत. गुप्ताने म्हटलं आहे की त्याच्यावर खोटे आरोप ठेवून त्याला या प्रकरणात अडकवले जात आहे.
एप्रिल २०२४ मध्ये वॉशिंग्टन पोस्टने एक वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्यानुसार रीसर्च अँड अॅनालिसिस विंगमधील (रॉ) अधिकारी विक्रम यादव हे गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येच्या कटाचे सूत्रधार होते. वृत्तपत्राने दावा केला होता की, ‘रॉ’ चे तत्कालीन प्रमुख सामंत गोयल यांनी या मोहिमेला मान्यता दिली होती.