संग्रहित छायाचित्र
यांगुन: म्यानमार हे सध्या अंतर्गत यादवीने ग्रस्त आहे. म्यानमारमधील बंडखोर गट असलेल्या अराकान आर्मीने बांगलादेशला लागून असलेल्या माउंगदाव शहरावर कब्जा केल्याचा दावा केला आहे. माउंगदाव हा अराकान राज्याचा उत्तरेकडील भाग आहे. राखीन हे म्यानमारच्या देशव्यापी गृहयुद्धाचे केंद्रबिंदू बनले आहे, ज्यामध्ये लोकशाही समर्थक गनिम आणि वांशिक अल्पसंख्याक सशस्त्र दल स्वायत्ततेची लढाई देशाच्या लष्करी शासकांविरुद्ध लढत आहेत.
अरकान आर्मीचे प्रवक्ते खाईंग थुखा यांनी सोमवारी सांगितले की त्यांनी माउंगदावमधील शेवटची उर्वरित लष्करी चौकी देखील ताब्यात घेतली आहे. यावेळी त्यांनी तेथून पळ काढत लष्कराचा जनरल थुरिन तुन याला पकडले. म्यानमारच्या लष्करी सरकारने या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हा प्रदेश बांगलादेशच्या कॉक्स बाजार क्षेत्राला लागून आहे आणि २७१ किमी लांबीची सीमा सामायिक करते.
आधुनिक काळातदेखील या देशाच्या राजकीय पटलावर वांशिक तणावांची पडछाया पडल्याचे दिसून येते. इ.स. १९९२ सालापासून म्यानमारची शासनव्यवस्था जनरल थान श्वे यांच्या नेतृत्वाखालील लष्करप्रणीत आघाडी सरकाराच्या नियंत्रणात आहे. २०२१ मध्ये आँग सान स्यू की यांच्या निवडलेल्या सरकारची लष्कराने हकालपट्टी केल्यानंतर सत्ता हाती घेतली.
रोहिंग्या संघर्ष भूमी
रोहिंग्या संघर्ष हा म्यानमारच्या (पूर्वी अरकान, बर्मा म्हणून ओळखला जाणारा) राखीन राज्याच्या उत्तरेकडील भागात सुरू असलेला संघर्ष आहे. रोहिंग्या मुस्लिम आणि राखीन बौद्ध समुदायांमधील सांप्रदायिक हिंसाचार, म्यानमारच्या सैन्याद्वारे रोहिंग्या नागरिकांवर लष्करी कारवाई केल्यानंतर आणि रोहिंग्या बंडखोरां गटांनी सैन्यावर दहशतवादी हल्ले केले. म्यानमारमधील हा संघर्षाचा प्रदेश बांगलादेशच्या सीमेवर आहे. ज्यामध्ये बुथिडाँग, मांगडॉ आणि राथेडाँग टाउनशिप भागाचा समावेश होतो.
माउंगदाव हे म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या मंडालेपासून दक्षिण-पश्चिम सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर आहे. जूनपासून हा भाग अराकान आर्मीच्या निशाण्यावर आहे. अरकान आर्मीने या वर्षाच्या सुरुवातीला बांगलादेशच्या सीमेजवळील दोन शहरे पलेतवा आणि बुथिदांग ताब्यात घेतली.
यापूर्वी, नोव्हेंबर २०२३ मध्ये, अराकान आर्मीने राखिन राज्यातील १७ पैकी ११ शहरांवर ताबा मिळवला होता. याशिवाय त्यांनी चिन या दुसऱ्या राज्यातील एका शहरावरही हल्ला करून ताबा मिळवला. म्यानमार लष्कराचा राखीनमधील ऐन शहरात लष्करी तळ आहे. येथून देशाच्या पश्चिम भागावर लक्ष ठेवले जाते. वृत्तानुसार, ऐन शहर लवकरच अरकान आर्मीच्या ताब्यात जाऊ शकते.
स्वतंत्र देश स्थापन करण्याचा प्रयत्न
राखीन सैन्याने शुक्रवारी रात्री सोशल मीडियावर सांगितले की त्यांनी ऐन शहरातील लष्कराच्या वेस्टर्न कमांडसह ३० हून अधिक लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत. अराकान आर्मी म्यानमार-बांगलादेश सीमेवर स्वतंत्र देश स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. अरकान आर्मी म्यानमारमधील इतर बंडखोर गटांशी युती करून आपली स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या अनेक गट म्यानमारच्या सैन्याविरुद्ध लढत आहेत. बीबीसी वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, म्यानमारमध्ये लष्करी सरकारविरोधात अनेक गट लढत आहेत. त्यांनी मिळून एक युती तयार केली आहे, ज्यात म्यानमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मी (MNDAA), तौंग नॅशनल लिबरेशन आर्मी (TNLA) आणि अरकान आर्मी यांचा समावेश आहे.
लष्करी सरकार उलथून टाकणे हा उद्देश
हे गट गेल्या अनेक वर्षांपासून म्यानमार सरकारविरोधात लढत आहेत. पूर्वी त्यांचा उद्देश त्यांच्या प्रदेश आणि समुदायाच्या हिताची मागणी करणे हे होते. परंतु आता आघाडीचे उद्दिष्ट म्यानमारचे लष्करी सरकार उलथून टाकणे आहे.
२०२१ मध्ये, लष्कराने म्यानमारमध्ये निवडून आलेल्या सरकारला सत्तेवरून हटवले. यानंतर राज्य समुपदेशक आंग सान स्यू की आणि राष्ट्राध्यक्ष विन मिंट यांच्यासह अनेक नेत्यांना अटक करण्यात आली.
सू की सध्या राजधानी नपिटामध्ये २७ वर्षांची शिक्षा भोगत आहेत. यानंतर लष्करी नेते जनरल मिन आंग हलाईंग यांनी स्वत:ला देशाचे पंतप्रधान घोषित केले. लष्कराने देशात २ वर्षांची आणीबाणी जाहीर केली होती. मात्र, नंतर त्यात वाढ करण्यात आली. या वर्षी जुलैमध्ये, कोकांग बंडखोर गट एमएनडीएएने सैन्याचा पराभव केला आणि उत्तर शान राज्यातील लाशिओ शहर ताब्यात घेतले. लाशिओ हे चीनच्या सीमेवर स्थित आहे आणि बर्मी सैन्याच्या उत्तर-पूर्व कमांडचे मुख्यालय येथे आहे.
याशिवाय काचिन इंडिपेंडेंट आर्मी (KIA) देखील म्यानमार आर्मीसाठी एक समस्या आहे. केआयएने काचिनमधील अनेक भाग जिंकले आहेत. चीनने काचिन इंडिपेंडन्स आर्मी, म्यानमार नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आर्मी (MNDAA) आणि तौंग नॅशनल लिबरेशन आर्मी (TNLA) यांना त्यांचे हल्ले थांबवण्यास सांगितले आहे. यासोबतच अन्नधान्य, वीज आणि इंधनाचा पुरवठा बंद करण्याचा धोका आहे.
चीन आणि एमएनडीएए आणि टीएनएलए यांच्यातील तणाव जूनपासून वाढला आहे, जेव्हा दोन्ही गटांनी चीनच्या शांतता कराराचा त्याग केला. त्यानंतर एमएनडीएएने नॉर्थईस्टर्न कमांड आणि उत्तर शान राज्याची राजधानी लाशिओ ताब्यात घेतली. प्रत्युत्तरादाखल चीनने आपले शान राज्य सीमा क्रॉसिंग बंद केले. मात्र, त्याचा बंडखोरांवर काहीही परिणाम होत नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.