संग्रहित छायाचित्र
कझाकिस्तानमध्ये पुढील महिन्यात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची शिखर परिषद होत आहे. या परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या जागी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते. ही परिषद ३ आणि ४ जुलै रोजी येथे होत आहे. यापूर्वी शांघाय शिखर परिषदेसाठी मोदी कझाकिस्तानला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा पथकाने अस्ताना येथे जाऊन तेथील सुरक्षेचा आढावा घेतला होता. परिषदेला पुतिन, जिनपिंग आणि शाहबाज शरीफ हजर राहणार असून त्यांच्या भेटीची संधी मोदी यांना गमवावी लागणार आहे.
शांघाय परिषद ही मध्य आशियातील सर्व देशांमधील शांतता आणि सहकार्य राखण्यासाठी तयार केलेली संघटना आहे. पाकिस्तान, चीन आणि रशियाही त्याचे सदस्य आहेत. परिषदेला पुतिन, जिनपिंग आणि शाहबाज शरीफ हजर राहणार आहेत. अशा परिस्थितीत मोदींच्या गैरहजेरीत भारताबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांना दिल्लीत शांघाय परिषदेमधील मोदींच्या उपस्थितीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. याबाबत अद्याप काहीही निश्चित झालेले नाही, असे जयस्वाल यांनी सांगितले.
संसदेच्या आगामी अधिवेशनामुळे मोदींनी शांघाय परिषदेतील सहभाग टाळल्याचे सांगण्यात येते. संसद अधिवेशन २४ जून ते ३ जुलैपर्यंत चालणार आहे. लोकसभेच्या अध्यक्षांची निवड आणि दोन्ही सभागृहांना राष्ट्रपतींचे अभिभाषण याशिवाय, पंतप्रधानांनी २ ते ३ जुलै दरम्यान लोकसभा, राज्यसभेत राष्ट्रपतींच्या आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देणे अपेक्षित आहे.
२०२२ मध्ये सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे भारत-रशियातील वाटाघाटी खूप कठीण झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वर्षांपासून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटू शकलेले नाहीत. उभय नेत्यांची शेवटची भेट २०२२ मध्ये उझबेकिस्तानमध्ये झालेल्या शांघाय शिखर परिषदेत झाली होती.
तेव्हा मोदींच्या युद्धावरील वक्तव्यावर बरीच चर्चा झाली होती. मोदींनी त्यावेळी पुतिन यांना सांगितले होते की, हे युद्धाचे युग नाही. तेव्हापासून भारत- रशियामध्ये वार्षिक पुतिन-मोदी भेट झालेली नाही. पुतिन यांनी चीन, उत्तर कोरिया आणि सौदीला भेट दिली असली तरी त्यांनी एकदाही भारताला भेट दिली नाही.
आता २ वर्षांनंतर शांघाय परिषदेत मोदी- पुतिन भेटीची संधी होती. परराष्ट्र व्यवहारतज्ज्ञ पत्रकार सुहासिनी हैदर यांच्या म्हणण्यानुसार, शपथविधीनंतर लगेचच मोदींनी जी ७ शिखर परिषदेसाठी इटलीला भेट दिली. विशेष म्हणजे भारत या संघटनेचा सदस्य नाही. भारत शांघाय परिषदेचा सदस्य असूनही तो सहभागी झाला नाही तर मध्य आशियासारख्या महत्त्वाच्या प्रदेशात तो एकटा पडू शकतो.
शांघाय परिषद २०२३ मध्ये भारतात होणार होती. त्यानंतरही सरकारने वेळापत्रकाचा हवाला देत ती ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, काहींच्या मते पुतिन, जिनपिंग आणि नवाझ शरीफ परिषदेला उपस्थित राहणार नसल्याच्या अटकळींमुळे भारताला ही परिषद ऑनलाइन घ्यावी लागली. बड्या नेत्यांच्या अनुपस्थितीत शिखर परिषद अयशस्वी ठरू शकली असती. भारताला दहशतवाद, सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर आपली मते ठामपणे मांडण्यासाठी शांघाय परिषद एक प्रभावी व्यासपीठ आहे.