संग्रहित छायाचित्र
रियाध: सौदी अरेबियाने २,६९,६०० हून अधिक लोकांना मक्केत प्रवेश करण्यापासून रोखले आहे. या लोकांकडे हज यात्रा करण्यासाठीची अधिकृत संमती नाही. मागच्या काही वर्षातील अपघाताच्या घटना लक्षात घेत यावेळी सरकारने संमतीशिवाय हज यात्रा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमचा उद्देश हजमध्ये होणारी अधिकची गर्दी रोखणे, हा असल्याचे एका अधिकाऱ्याने रविवारी (दि.१ ) म्हटले आहे. खरे तर, सौदी अरेबिया सरकार मक्केत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास प्राधान्य देते. मात्र परमिटशिवाय येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या वाढत चालली आहे. एवढेच नाही, तर गेल्या वर्षी उन्हामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये अशा भाविकांची संख्या अधिक होती. याशिवाय, विना परमिट हजला येणाऱ्यांसाठी ५,००० डॉलर्सपर्यंत दंड आणि हद्दपारीसारख्या शिक्षेचीही तरतूद आहे.
सौदीमध्ये राहणाऱ्यांनाही घ्यावे लागेल परमिट
नियमाप्रमाणे, केवळ परमिट असलेल्यांनाच हज करण्याची परवानगी दिली जाते. यात, सौदी अरेबियाचे आणि तेथील नागरिकांचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांनी हज नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २३ हजारहून अधिक सौदीच्या नागरिकांना दंड केला आहे. तसेच ४०० हज कंपन्यांचे लायसन्सदेखील रद्द केले आहेत.सध्या मक्केत अधिकृतपणे १४ लाख मुस्लीम आहेत. येत्या काळात ही संख्या वाढू शकते. हज ही मक्का येथे होणारी वार्षिक इस्लामिक तीर्थयात्रा आहे. यात अनेक धार्मिक विधींचा समावेश असतो. मुस्लीम धर्मात, हज करणे हे शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे दायित्व आहे. गेल्या काही वर्षांत सौदी अरेबियातील तापमानवाढीचा हज यात्रेवर मोठा परिणाम झाला आहे. कारण यात्रेकरू दिवसाच्या गर्मीमध्येच उघड्यावर आपले विधी करतात. २० लाखांहुन अधिक लोक या ५ दिवसीय तीर्थयात्रेसाठी सौदी अरेबियामध्ये पोहोचतात. यावेळी अनेकवेळा चेंगराचेंगरीही दिसून आली आहे.