संग्रहीत छायाचित्र
नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील एका रुग्णालयातील दोन परिचारिकांना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निलंबित करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये त्या इस्रायली रुग्णांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण करताना दिसत आहे. इस्रायली रुग्णांवर उपचार करण्यास नकार देत आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे देण्यात आले. हा व्हिडिओ टिकटॉकवर आला आणि सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला.
न्यू साउथ वेल्स (NSW) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी कर्मचारी सिडनीमधील एका रुग्णालयात काम करत होत्या. न्यू साउथ वेल्सचे आरोग्यमंत्री रायन पार्क म्हणाले की, कोणत्याही रुग्णाला इजा होऊ नये यासाठी या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल. "या दोन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे आणि ते पुन्हा कधीही NSW आरोग्य विभागात काम करू नयेत याची खात्री केली जाईल," असेही त्यांनी सांगितले.
- काय आहे प्रकरण
हा व्हिडिओ रुग्णालयाच्या आत रेकॉर्ड केलेला दिसतो. डॉक्टर असल्याचा दावा करणारा एक माणूस रुग्णालयातील रुग्णाला म्हणतो, "तुझे डोळे सुंदर आहेत... मला माफ कर तू इस्रायली आहेस," यानंतर एक महिला येते आणि म्हणते, "एक दिवस तुझीही वेळ येईल आणि तू मरशील. मी त्यांच्यावर उपचार करणार नाही, मी त्यांना मारून टाकेन." हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ऑस्ट्रेलियन समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि या घटनेबाबत पुढील कारवाई अपेक्षित आहे.
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही या व्हिडिओचा निषेध केला आणि ते म्हणाले की, हे "घृणास्पद आणि लज्जास्पद" आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर लिहिले की, "आपल्या आरोग्य व्यवस्थेत किंवा ऑस्ट्रेलियामध्ये कुठेही द्वेषाने प्रेरित यहूदी-विरोधी टिप्पण्या स्वीकार्य नाहीत. जर कोणी वंशवाद किंवा काही गुन्हा केला असेल तर त्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा केली जाईल."