संग्रहित छायाचित्र
#मॉस्को
रशियात शिक्षणासाठी गेलेल्या चार भारतीय विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला असून हे चारही विद्यार्थी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असल्याचे समजते. हर्षल देसले, जिशान पिंजारी, जिया पिंजारी अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे चारही विद्यार्थी रशियामधील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. सेंट पीटर्सबर्गजवळील एका नदीकाठावर हे विद्यार्थी सायंकाळी फिरण्यासाठी गेले होते. तेथे एका मित्राला वाचवताना चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एक विद्यार्थी नदीमध्ये उतरला होता. मात्र, तो नदीत बुडायला लागल्यामुळे त्याला मदत करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचाही बुडून मृत्यू झाला आहे. यापैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. दरम्यान, हे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या विद्यार्थ्यांचे मृतदेह लवकरात लवकर भारतात आणले जाणार आहेत. जळगाव येथील अधिकाऱ्यांकडून रशियातील स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्यात येत आहे. तसेच भारतीय दूतावासाच्या माध्यमातून रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. या घटनेत एक विद्यार्थिनीही नदीत पडली होती. मात्र, तिला वाचवण्यात यश आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेबाबत जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या घटनेस पुष्टी दिली आहे. हर्षल देसले, जिशान पिंजारी, जिया पिंजारी अशी घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये शिक्षण घेत होते.
दरम्यान, ही घटना ४ जून रोजी संध्याकाळी सेंट पीटर्सबर्गजवळच्या नदीत घडली आहे. ही घटना घडल्यानंतर रशियातील प्रशासन आणि पोलिसांच्या वतीने भारतीय दूतावासाला घटनेबाबत कळवण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. यातील हर्षल देसले या विद्यार्थ्याचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.