सग्रहीत छायाचित्र
वॉशिंग्टन – जगप्रसिद्ध उद्योगपती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व एलॉन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनाच्या नव्या कर आणि खर्च विधेयकावर तीव्र टीका केली आहे. सामाजिक माध्यमांवर थेट पोस्ट करत मस्क यांनी या विधेयकाला 'घृणास्पद', 'लज्जास्पद' आणि 'हास्यास्पद' अशी कठोर विशेषणे वापरत आपला रोष व्यक्त केला.
"माफ करा, पण मी हे आता सहन करू शकत नाही... हे काँग्रेसचे खर्चाने भरलेले हास्यास्पद विधेयक आहे. ज्यांनी या विधेयकाला मतदान केलं, त्यांना लाज वाटली पाहिजे. कारण त्यांना माहित आहे की त्यांनी चुकीचं केलं आहे," असे म्हणत मस्क यांनी या विधेयकाविरोधातील आपला संताप स्पष्ट केला.
बजेटमध्ये तुटीचा गंभीर इशारा
मस्क यांच्या मते, हे विधेयक अमेरिकेच्या आधीच असलेल्या मोठ्या बजेट तुटीला आणखी गडद करेल. त्यांच्या अंदाजानुसार, देशाची तूट २.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे देशावर असलेला कर्जभार अस्थिर पातळीवर जाण्याचा धोका निर्माण होईल.
DOGE प्रमुखपदाचा राजीनामा
काही दिवसांपूर्वीच एलॉन मस्क यांनी ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ (DOGE) या संघीय खर्च कमी करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या यंत्रणेच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला. या निर्णयानंतर त्यांनी ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांपासून स्वतःला स्पष्टपणे दूर ठेवले आहे.
व्हाईट हाऊसचे प्रत्युत्तर
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी मस्क यांच्या टीकेला कमी लेखताना म्हटलं, "राष्ट्रपती ट्रम्प यांना मस्क काय विचार करतात हे आधीच माहित होतं, पण त्यामुळे त्यांच्या भूमिकेत काहीही फरक पडणार नाही. हे विधेयक राष्ट्रपतींच्या आर्थिक धोरणाचा कणा आहे आणि ते त्यावर ठाम आहेत."
राजकीय वर्तुळातील संमिश्र प्रतिक्रिया
केंटकीचे रिपब्लिकन खासदार थॉमस मॅसी यांनी एलॉन मस्क यांना पाठिंबा देत, त्यांचा निषेध योग्य असल्याचं सांगितलं. त्यावर प्रत्युत्तर देताना मस्क यांनी "सोपे गणित" या दोन शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे, हाऊस स्पीकर माइक जॉन्सन यांनी मस्क यांच्या भूमिकेला "अतिशय निराशाजनक" असं म्हटलं. त्यांनी सांगितलं की, सोमवारी त्यांनी मस्क यांच्याशी २० मिनिटे चर्चा केली होती आणि या विधेयकामुळे कर कपात व निवडणूक आश्वासनांची पूर्तता शक्य होईल, हे समजावण्याचा प्रयत्न केला होता.
याच मस्क यांनी २०२४ च्या निवडणूक मोहिमेसाठी ट्रम्प यांना तब्बल २५० दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली होती. त्यानंतर DOGE या सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवणाऱ्या उपक्रमाचे नेतृत्वही केलं होतं. मात्र आता, त्याच सरकारच्या खर्च धोरणावर त्यांनी उघडपणे आक्रमण केल्याने चर्चेला अधिक उधाण आलं आहे.