पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचा दौरा करून व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू केल्या होत्या. त्यानंतर भारत आणि अमेरिकेतील चर्चेच्या पाच फेऱ्या पार पडल्या आहेत. सहावी फेरी ऑगस्ट महिन्याच्या अखेर भारतात होणार होती. मात्र आता अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी येथील अधिकाऱ्यांचा भारत दौरा सध्या स्थगित करण्यात आला आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. जागतिक स्तरावर कोणत्याही देशावर लादण्यात आलेला हा सर्वाधिक टॅरिफ असल्याचे सांगितले जात आहे. यापैकी २५ टक्के टॅरिफ आधीच अमलात आले आहे. तसेच, रशियाकडून भारताने तेलाची आयात चालू ठेवली असल्यामुळे आणखी २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्यात येणार आहे.
सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भू-राजकीय घडामोडी कशा प्रकारे घडतात, यावर अमेरिकेच्या निर्णयाचे पुढील स्वरूप अवलंबून राहील. त्यामुळे भारत-अमेरिका व्यापार कराराच्या वाटाघाटींवर तात्पुरता ब्रेक लागल्याचे स्पष्ट होत आहे.


