वॉशिंग्टन – इराणविरुद्ध युद्ध संघर्ष सुरू असतानाच, अमेरिकन संरक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी अमेरिकन लष्कराचे सर्वोच्च अधिकारी आणि ४१ वे चीफ ऑफ स्टाफ जनरल रँडी जॉर्ज यांची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. जॉर्ज यांच्यासोबतच अन्य दोन वरिष्ठ जनरलनाही पदावरून दूर करण्यात आले असून, युद्ध सुरू असतानाच घेतलेल्या या निर्णयामुळे जागतिक संरक्षण वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पेंटागॉनचे मुख्य प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी गुरुवारी (दि.२) ही माहिती दिली. जनरल जॉर्ज हे ऑगस्ट २०२३ पासून लष्करप्रमुख म्हणून कार्यरत होते. सामान्यतः या पदाचा कार्यकाळ चार वर्षांचा असतो, मात्र ट्रम्प प्रशासनाने त्यांना कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच निवृत्त होण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच आठवड्यांपासून अमेरिका आणि इस्रायल इराणवर सातत्याने हल्ले करत आहेत. अशा संवेदनशील वेळी लष्कराचे सर्वोच्च नेतृत्व बदलणे हे अत्यंत धाडसी आणि तितकेच जोखमीचे पाऊल मानले जात आहे.
केवळ जनरल जॉर्जच नव्हे, तर आर्मी ट्रान्सफॉर्मेशन अँड ट्रेनिंग कमांडचे प्रमुख जनरल डेव्हिड होडने आणि लष्कराचे मुख्य चॅपलेन (धार्मिक प्रमुख) मेजर जनरल विल्यम ग्रीन यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे. हेगसेथ यांनी लष्करातील जनरल अधिकाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि प्रशासकीय आधुनिकीकरणासाठी ही मोठी ‘स्वच्छता मोहीम’ राबवल्याचे बोलले जात आहे.
यातील विल्यम ग्रीन यांची हकालपट्टी लक्षवेधी ठरली आहे. हेगसेथ यांनी नुकतेच लष्करी चॅपलेन कोअरमध्ये मोठे बदल सुचवले होते. सैनिकांच्या मानसिक आरोग्यासाठी मानसशास्त्रीय उपचारांऐवजी केवळ ‘देवावर आणि धर्मावर’ लक्ष केंद्रित करावे, असे आदेश त्यांनी दिले होते. तसेच चॅपलेननी त्यांच्या गणवेशावर हुद्द्याची रँक लावू नये, असेही नवे नियम त्यांनी लागू केले आहेत.
जनरल जॉर्च यांची गच्छंती का झाली?
जनरल जॉर्ज यांच्या हकालपट्टीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासनाच्या लष्करी योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत जनरल जॉर्ज यांच्या क्षमतेवर प्रशासनाला शंका होती. संरक्षण मंत्री हेगसेथ यांना अशा नेतृत्वाची गरज आहे, जे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ध्येयधोरणांशी पूर्णपणे सुसंगत असेल. ट्रम्प प्रशासन आणि जनरल जॉर्ज यांच्यात लष्करी धोरणांवरून मतभेद असल्याची चर्चाही सुरू आहे.
नव्या लष्करप्रमुखांची प्रगती नजरेत भरणारी
रँडी जॉर्ज यांच्या जागी आता जनरल ख्रिस्तोफर ला नेव्ह हे प्रभारी लष्करप्रमुख म्हणून धुरा सांभाळतील. ला नेव्ह हे संरक्षण मंत्री हेगसेथ यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. दोन वर्षांपूर्वीपर्यंत ला नेव्ह हे केवळ ‘टू-स्टार’ जनरल होते, मात्र ट्रम्प प्रशासनात त्यांची प्रगती ‘रॉकेट’ वेगाने झाली आहे. गेल्या ऑक्टोबरमध्येच त्यांची व्हाईस चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती झाली होती आणि आता ते थेट लष्कराच्या सर्वोच्च स्थानी पोहोचले आहेत.
इराणला अश्मयुगात धाडण्याचा इशारा
लष्करी नेतृत्वातील हे फेरबदल अशा वेळी होत आहेत, जेव्हा अमेरिकेची हजारो सैनिक आणि युद्धनौका मध्यपूर्वेकडे रवाना झाल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी रात्री देशाला संबोधित करताना इराणविरुद्ध आक्रमक पवित्रा जाहीर केला. “येत्या दोन ते तीन आठवड्यांत आम्ही इराणवर असा प्रहार करू की, त्यांना पुन्हा अश्मयुगात जावे लागेल,” असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. संरक्षण मंत्री हेगसेथ यांनीही सोशल मीडियावर “बॅक टू स्टोन एज” अशी पोस्ट लिहून ट्रम्प यांच्या इशाऱ्याचे समर्थन केले.
इराणचे चोख प्रत्युत्तर
ट्रम्प यांच्या विधानावर इराणने कडक शब्दांत टीका केली आहे. “इराणची संस्कृती ७,००० वर्षांहून अधिक प्राचीन आहे. ट्रम्प यांचे विधान हे शक्तीचे नसून त्यांच्या अज्ञानाचे लक्षण आहे,” असे प्रत्युत्तर इराणच्या संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधींनी दिले आहे. सध्या अमेरिकन लष्करातील ८२ वी एअरबोर्न डिव्हिजन आणि हजारो मरीन सैनिक युद्धासाठी सज्ज आहेत. अंतर्गत नेतृत्वातील या बदलांमुळे युद्धाच्या रणनीतीवर काय परिणाम होतो, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
अमेरिका-इस्रायलचे इराणच्या पायाभूत सुविधांवर हल्ले
इराणमधील संघर्ष अधिक तीव्र होत आहे. अमेरिका आणि इस्रायलने आता इराणच्या पायाभूत सुविधांवरील हल्ले वाढवल्याचे वृत्त आहे. पूल, स्टील प्लांट, वैद्यकीय सुविधा केंद्रे यांसारख्या ठिकाणांवर बॉम्बहल्ले केल्यामुळे इराणचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यांनंतर आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन होत आहे का? यावर चर्चा सुरू झाली असून जिनिव्हा कन्व्हेन्शन पुन्हा चर्चेत आले आहे.


