अभिनेत्री सागरिका घाटगे आणि भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लग्नानंतर ७ वर्षांनी झहीर -सागरिका आई-बाबा बनले असून त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सोशल मीडियावर पस्ट करत दोघांनी सर्वांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे. तसेच, बाळाचा फोटो शेअर करत चिमुकल्याच्या नावाची घोषणादेखील केली आहे.
सागरिकाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर बाळाबरोबरचा पहिला फोटो शेअर केला आहे. यासोबत तिनं खास कॅप्शनदेखील दिली आहे. “प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादांसह आम्ही आमचा गोंडस मुलगा फतेहसिंह खानचं स्वागत करत आहोत.” अशा आशयाची कॅप्शन देत सागरिकाने बाळाचं नाव 'फतेहसिंह' खान ठेवल्याचे सांगितलं आहे. सध्या सागरिकाच्या पोस्टवर बॉलीवूडसह मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
चक दे इंडिया सह अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या सागरिका घाटगे आणि भारताचा माजी नामवंत गोलंदाज झहीर खान या दोघांचं लव्ह मॅरेज असून 23 नोव्हेंबर 2017 ला दोघे लग्नबंधनात अडकले.
सागरिका झहीरची लव्हस्टोरी
सागरिका आणि झहीरची ओळख अंगद बेदी आणि इतर काही मित्रांमुळे झाली. त्यानंतर दोघांनी जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केले. अनेक कार्यक्रमांमध्येही ते एकत्र दिसू लागले. इतकेच नव्हे तर आयपीएल सामन्यांवेळीही सागरिका त्याला पाठिंबा देताना दिसली होती. अखेर या दोघांनी २०१७ मध्ये नोंदणी पद्धतीने लग्न केलं.
सागरिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुखबरोबर बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सागरिकाने ‘फॉक्स’, ‘मिले ना मिले हम’, ‘रश’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याव्यतिरीक्त तिने अतुल कुलकर्णींबरोबर ‘प्रेमाची गोष्ट’ या मराठी चित्रपटातही काम केलं आहे.