संग्रहित छायाचित्र....
Captaincy of RCB in IPL 2025 : आयपीएल २०२५ मार्चमध्ये सुरू होणार आहे. सर्व फ्रँचायझीं आगामी हंगामासाठी सज्ज असून त्यांच्या संघांनीही तयारी सुरू केली आहे. यावेळी जवळजवळ सर्वच संघ मोठे बदल घेऊन येतील. त्याच वेळी, सर्वांच्या नजरा आरसीबीवरही आहेत. १७ वर्षांपासून आयपीएल ट्रॉफीच्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या आरसीबीने अद्याप आपला कर्णधार जाहीर केलेला नाही. विराट कोहली आरसीबीचा नवा कर्णधार असेल असे मानले जात आहे. पण, त्यापूर्वी फ्रँचायझीने त्यांच्या नवीन कर्णधाराबाबत काही प्रश्नांची उत्तरे देखील दिली आहेत.
आरसीबीचा नवा कर्णधार कोण असेल?
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात आरसीबीने कोणत्याही आयपीएल कर्णधारावर बोली लावली नाही. अशा परिस्थितीत, येत्या हंगामात विराट पुन्हा आरसीबीची जबाबदारी स्वीकारेल अशी शक्यता वर्तवली जात होती. आता, आरसीबीच्या नवीन कर्णधाराबाबत स्पोर्ट्स तकशी बोलताना, फ्रँचायझीचे सीओओ राजेश मेनन म्हणाले की, "सध्या आम्ही काहीही ठरवलेले नाही. नेतृत्व करू शकतील असे आमच्या संघात ४-५ दिग्गज खेळाडू आहेत. आम्हाला काय करायचे आहे यावर आम्ही अजून चर्चा केलेली नाही. आम्ही चर्चा करू आणि नंतर निष्कर्षापर्यंत पोहोचू."
आयपीएल मेगा लिलाव २०२५ मध्ये खरेदी केलेल्या खेळाडूंबद्दल राजेश मेनन म्हणाले की, "याबद्दल आम्ही अगदी सुरूवातीपासूनच स्पष्ट होतो की आमच्या पथकात कोणत्या प्रकारची कमतरता आहे, आम्हाला काय करायचे आहे आणि आम्हाला कोणत्या प्रकारचा भारतीय कोअर संघ तयार करायचा आहे. आणि जर एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळायचे असेल तर कोणत्या प्रकारच्या गोलंदाजीची आवश्यकता आहे? आणि आम्ही आमच्या संघासाठीही तेच केले."
विराट कोहली २००८ पासून संघाचा भाग...
दरम्यान, विराटने अनेक वर्षे आरसीबीचे नेतृत्व केले आहे. १४३ सामन्यांमध्ये आरसीबीचे नेतृत्व करताना त्याने ६६ सामने जिंकले आहेत तर ७० सामन्यांमध्ये त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विराट कोहली २००८ पासून आरसीबीचा भाग आहे. त्याने अनेक वर्षे या संघाचे नेतृत्वही केले आहे. पण रन मशीनला एकदाही त्याच्या संघाला चॅम्पियन बनवता आलेले नाही.