ऑस्ट्रेलिया देईल तेवढ्या टार्गेटचा पाठलाग करणार
#लंडन
जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेची अंतिम लढत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू आहे. अखेरच्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ देईल त्या टार्गेटचा आम्ही यशस्वीपणे पाठलाग करू, असा आत्मविश्वासपूर्ण निर्धार भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने व्यक्त केला आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि जतिन सप्रू यांनी अजिंक्य रहाणेसोबत संवाद साधला. या दरम्यान गांगुलीने रहाणेला प्रश्न विचारला, ‘‘किती चेस करू शकाल?’’
यावर रहाणेने आत्मविश्वासाने परिपूर्ण उत्तर दिले, ‘‘ऑस्ट्रेलिया देईल तेवढं.’’
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यात चांदीच्या गदेसाठी लढाई सुरू आहे. टीम इंडियाला पहिल्या डावात २९६ धावांवर ऑलआऊट केल्यानं ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १७३ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ४४ षटकांत ४ बाद १२३ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची आघाडी तिसऱ्या दिवसाअखेर २९६ धावांवर जाऊन पोहोचली होती.
अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुर या दोघांच्या झुंजार खेळीच्या जोरावर भारताला तीनशेच्या घरात मजल मारता आली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली. रहाणेने १७ महिन्यांनंतर यशस्वी पुनरागमन करताना ८९ धावांची झुंजार खेळी केली, तर शार्दुल ठाकूरने ओव्हलमध्ये अर्धशतकांची हॅटट्रिक केली.
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यांनतर रहाणेसोबत संवाद साधला. जतीन सप्रूदेखील त्यांच्यासोबत होता. दोघांनी रहाणेला अनेक प्रश्न विचारले. तसेच गांगुलीने रहाणेला “किती धावांचा पाठलाग करू शकाल,” असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर रहाणेने अवघ्या तीन शब्दांत मन जिंकणारं उत्तर दिलं, “ऑस्ट्रेलिया देईल तेवढं.” रहाणेच्या या उत्तराने त्याच्या आत्मविश्वासाचं दर्शन झालं. या उत्तराने त्याने अनेकांची मने जिंकली.
वृत्तसंस्था