अश्विनला संघाबाहेर का ठेवले?
#मुंबई
जागतिक कसाेटी अजिंक्यपद मालिकेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून ज्या पद्धतीने पराभूत झाला, त्यावररून आता टीकेची झोड उठवण्यात येत आहे. एरवी, कोणत्याही स्पर्धेसाठी संघनिवड किंवा इतर मुद्यांवर टीकाटिप्पणी टाळणारा क्रिकेटविश्वातील महान फलंदाज सचिन तेंडुलकरलाही यावेळी ‘‘रवीचंद्रन अश्विनला संघाबाहेर का ठेवले,’’ हा प्रश्न विचारल्यावाचून राहवले नाही.
अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा तब्बल २०९ धावांनी धुव्वा उडवत कसोटीतील जगज्जेतेपद आपल्या नावे केले. या मानहानीजनक पराभवानंतर भारताचे क्रिकेट दिग्गज संघावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अश्विनसारख्या फिरकीपटूला संघाबाहेर ठेवल्याबद्दल सचिनने आश्चर्य व्यक्त केले.
‘‘खेळात टिकून राहण्यासाठी भारताला पहिल्या डावात अधिक धावा करण्याची गरज होती, पण ते करू शकले नाहीत. अश्विनला का बाहेर ठेवले हे मला समजत नाही. तो जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज आहे,’’ असे ट्विट करत सचिनने भारताच्या संघनिवडीवर बोट ठेवले. तो पुढे म्हणतो, ‘‘सामन्यापूर्वी मी असेही म्हटले होते की प्रतिभावान फिरकीपटू नेहमीच टर्निंग विकेट्सवर अवलंबून नसतात. ते बाऊन्स आणि वेगात फरक असलेल्या विकेटचा वापर करतात. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या आठ फलंदाजांपैकी पाच डावखुरे होते.’’ या मालिकेत अश्विनने १३ कसोटीमध्ये ६१ बळी घेतले. याकडे लक्ष वेधत तरीही अश्विनला वगळण्यात आल्याने सचिनने आश्चर्य व्यक्त केले.
वीरूनेही सुनावले
भारताचा माजी धडाकेबाज सलामी फलंदाज वीरेंद्र सहवाग म्हणाला, ‘‘कांगारू या विजयाचे हकदार होते. ऑस्ट्रेलियाच्या मजबूत डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध भारतीय संघाने अश्विनला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हाच आपण हा सामना मानसिकदृष्ट्या हरलो होतो. टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी जबाबदारीने खेळायला हवे होते. अशी मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी कणखर मानसिकता आणि विजयी दृष्टिकोन आवश्यक असतो. त्याचा भारतीय संघात अभाव जाणवला.’’
अश्विन भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील अव्वल फिरकीपटूंत गणना होणाऱ्या गोलंदाजाला तुम्ही संघाबाहेर ठेवत असाल तर तुमचा आत्मविश्वास कमी असल्याचं हे लक्षण आहे, असे सुनावत वीरूने अश्विनला बाहेर ठेवण्यावरून संघव्यवस्थापनावर निशाणा साधला.
वृत्तसंस्था