ट्रोलिंगमुळे बिघडते मानसिकता
#लखनौ
दुखापतीमुळे केएल राहुल आयपीएलच्या १६ व्या हंगामातून दूर राहिला आहे. त्यामुळेच त्याला लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाची धुराही सोडावी लागली आहे. नुकतीच त्याच्या मांडीच्या स्नायूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या विश्रांती घेत असलेल्या केएल राहुलने एका वृत्तवाहिनीवरील 'द रणवीर शो' मध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमात त्याने दिलखुलास भाष्य केले आहे. यावेळी राहुल पहिल्यांदाच त्याच्याविरुद्ध सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबाबत उघडपणे बोलला आहे.
राहुल म्हणाला की, जरी काही क्रिकेटपटू ट्रोल करणाऱ्यांना जास्त भाव देत नसले तरी काही वेळा याचा आमच्यावर परिणाम होतो. काही खेळाडू संवेदनशील असतात, ते लगेच मनावर घेतात. ट्रोलिंगचा काही वेळा माझ्यावरही परिणाम होतो. माझ्यासह इतर खेळाडूंनाही याचा अनुभव येतो. खेळाडूला ज्यावेळी खऱ्या अर्थाने पाठबळ मिळण्याची अपेक्षा असते, त्यावेळी लोक काहीही टीका करत सुटतात. खेळाडूंकडे माणूस म्हणून पाहायला हवे, त्यांच्या मानसिकतेचा विचार करायला हवा. उगाच तोंड दिले म्हणून काहीही बोलण्यात काय अर्थ आहे, अशी खंत त्याने व्यक्त केली आहे.
२०२२ चा वर्ल्डकप झाल्यापासून केएल राहुल हा ट्रोल करणाऱ्यांच्या निशाण्यावर असतो. एवढेच नाही तर माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसादने देखील त्याच्यावर खराब कामगिरीनंतर टीका केली होती. राहुलला २०२२ मध्ये एकाही सामन्यात शतकी खेळी करण्यात यश आले नव्हते. त्याला वनडे, टी-२० आणि कसोटी संघाचे उपकर्णधारपदही गमवावे लागले होते. राहुलने मान्य केले की, मी माझे शंभर टक्के प्रयत्न करत होतो. मात्र परिस्थिती मला अनुकूल नव्हती. आमच्यापैकी कोणालाही खराब कामगिरी करण्याची इच्छा नसते. हे आमचे आयुष्य आहे. हेच आम्ही सर्व करत आलो आहोत. मला क्रिकेटशिवाय दुसरे काही येत नाही. ही एकच गोष्ट आहे जी मी करू शकतो. त्यामुळे कोणी मी खेळाबद्दल गंभीर नाही, असे कसे म्हणू शकताे, असा सवालही त्याने उपस्थित केला आहे.
दरम्यान केएल राहुलवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आता तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत जाण्यास सज्ज झाला आहे. केएल राहुलचा भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपपूर्वी संघात परतण्याचा प्रयत्न आहे.