संग्रहित छायाचित्र
मियामी: कोपा अमेरिका स्पर्धेतील अटीतटीच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत गोल करत कोलंबियाला १-०ने नमवत विजेतेपद कायम राखले.
हार्डराॅक स्टेडियमवर सोमवारी (दि. १५) सकाळी झालेल्या अंतिम फेरीतील निर्णायक गोल मार्टिनेंझ याने ११२व्या मिनिटाला केला. या विजयासह लिओनेल मेस्सीच्या संघाने कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद आपल्याकडेच कायम राखला. यापूर्वी २०२१ मध्ये अर्जेंटिनाने ब्राझीलला १-०ने नमवून स्पर्धा जिंकली होती.
अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीने कोपा अमेरिका फायनल जिंकून आपल्या महान कामगिरीत आणखी एक भर घातली आहे. कोपा अमेरिका विजेतेपदाने मेस्सीला एक ऐतिहासिक यश मिळवून दिले. आता मेस्सी ब्राझीलच्या डॅनी अल्वेसचा विक्रम मोडत क्लब आणि देश या दोघांसह ४५ ट्रॉफी जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. मेस्सीचा रोझारियो येथील एका लहान मुलापासून ते फुटबॉलच्या इतिहासातील महान खेळाडूपर्यंतचा प्रवास जबरदस्त राहिला आहे.
एकेकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावर खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या मेस्सीने आता अर्जेंटिनासह अवघ्या तीन वर्षांत चार प्रमुख विजेतेपदे जिंकली आहेत. यामध्ये एक विश्वचषक, दोन कोपा अमेरिका विजेतेपदाचा समावेश आहे. त्याच्या शानदार क्लब कारकिर्दीत, मेस्सीने बार्सिलोनासह चार चॅम्पियन्स लीग विजेतेपदे आणि दहा ला लीगा चॅम्पियनशिप जिंकली आहेत.
वैयक्तिक कामगिरीचा विचार करता मेसीकडे विक्रमी आठ बॅलन डी’ओर्स आणि सहा युरोपियन गोल्डन बूट आहेत. एकूण, मेस्सीने १,०६८ सामन्यात १२१२ गोल आणि असिस्ट केले आहेत.