टीम इंडियाची नवी जर्सी लाँच
#नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघाची नवी जर्सी लाँच झाली आहे. स्पोर्ट्स ब्रँड ‘अदिदास’ हा टीम इंडियाचा नवीन किट प्रायोजक आहे. कंपनीने स्वत: व्हीडीओ जारी करून तीनही फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळ्या डिझाईनच्या जर्सी जारी केल्या. ७ जूनपासून खेळल्या जाणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया या नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे.
गेल्या महिन्यात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘अदिदास’सोबत २०२८ पर्यंत करार केला होता. भारतीय पुरुष क्रिकेट संघाव्यतिरिक्त ‘अदिदास’ हा महिला वरिष्ठ राष्ट्रीय क्रिकेट संघ, भारत ‘अ’, भारत ‘ब’ आणि १९ वर्षांखालील पुरुष आणि महिला क्रिकेट संघांच्या जर्सी प्रायोजित करेल.
जर्सी लाँच करण्याचा कार्यक्रम वानखेडे स्टेडियमवर पार पडला. येथे मोठमोठ्या जर्सी ड्रोनच्या माध्यमातून जगासमोर आणण्यात आल्या. ‘अदिदास इंडिया’ने या कार्यक्रमाची माहिती देणारा व्हीडीओ ट्विट केला आहे. १९९२ ते १९९९ च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघाची जर्सी ‘एसिक्स’ने बनवली होती. त्यानंतर २००५ पर्यंत क्रिकेट संघाला प्रायोजक नव्हता. डिसेंबर २००५ मध्ये नायकेने पाच वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली. यानंतर, ‘नायके’ने २०११ आणि २०१६ मध्येही करार केले. हा करार २०२० मध्ये संपला.
२०२० मध्ये ‘एमपीएल’ने ‘नायके’ची जागा घेतली. एमपीएलने केलेला करार २०२३ पर्यंत होता. मात्र, या कंपनीने मध्येच करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. यानंतर ‘किलर’ टीम इंडियाचा किट प्रायोजक बनला.
काश्मीरच्या आकिब वाणीने डिझाइन केले
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघ गडद निळ्या कॉलरलेस जर्सी घालून मैदानात उतरेल. दुसरीकडे, एकदिवसीय सामन्यांसाठी कॉलर असलेल्या जर्सीत हलका निळा रंग वापरण्यात आला आहे. कसोटी सामन्यांची आयसीसीच्या नियमानुसार पांढऱ्या रंगाची जर्सी वापरावी लागते. अदिदासच्या तिन्ही जर्सींच्या खांद्यावर प्रत्येकी ३ पट्टे आहेत. या जर्सी काश्मीरमधील डिझायनर आकिब वाणी यांनी डिझाइन केल्या आहेत.