कसोटी विश्वविजेतेपदासाठी टार्गेट ४४४
#लंडन
एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही प्रकारांत पूर्वी विश्वविजेतेपद प्राप्त केलेल्या भारतीय संघासमोर कसोटीतील विश्वविजेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाने शनिवारी (दि. १०) म्हणजे सामन्याच्या चौथ्या दिवशी तिसऱ्या सत्रापूर्वी ४४४ धावांचे अवघड आव्हान ठेवले आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावामध्ये १७३ धावांची मोठी आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ८४.३ षटकांत ८ बाद २७० धावांवर घोषित केला. कांगारूंचा निम्मा संघ १२४ धावांवर तंबूत परतल्यानंतर ॲलेक्स कॅरी (नाबाद ६६), मिचेल स्टार्क (४१) आणि कॅमेरून ग्रीन (२५) यांच्या योगदानामुळे या संघाने भारतासमोर कसोटीतील विश्वविजेतेपदासाठी साडेचारशेच्या घरात लक्ष्य ठेवण्यात यश मिळवले. भारतातर्फे रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३ तर मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. पहिल्या डावात प्रभावी मारा करणाऱ्या मोहम्मद सिराजला या डावात केवळ एक गडी बाद करता आला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा, सामना जिंकण्यासाठी ४४४ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ७ षटकांत बिनबाद ४१ धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा २२ तर शुभमन गिल १८ धावांवर खेळत होते.
तिसऱ्या दिवसअखेरच्या ४ बाद १२३ वरून पुढे खेळताना शनिवारी ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेनच्या (४१) रूपात पाचवा बळी झटपट गमावला. त्याला आपल्या कालच्या धावसंख्येत कोणतीही भर घालता आली नाही. त्यानंतर कॅरी-ग्रीन यांनी सहाव्या विकेटसाठी ४३ धावांची भागिदारी केली. जडेजाने ग्रीनचे (२५) दांडके उडवल्यानंतर कॅरी-स्टार्क जोडीने सातव्या विकेटसाठी ९३ धावा जोडत भारतासमोरील आव्हान वाढवले. स्टार्कपाठोपाठ कर्णधार कमिन्स (५) बाद होताच ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला.
विजयासाठी अवघड लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित-शुभमन जोडीने सकारात्मक प्रारंभ केला. रोहितने कमिन्सच्या पहिल्याच षटकात पूलचा देखणा चौकार लगावला. कमिन्सनेच टाकलेल्या तिसऱ्या षटकात रोहितने एक तर शुभमनने दोन चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. सातव्या षटकात रोहितने स्टार्कला फाईन लेगच्या दिशेने षटकारही खेचला. सामना जिंकण्यासाठी भारताला अद्यापही ४०३ धावांची गरज असून चौथ्या दिवसाचे तिसरे सत्र आणि पाचव्या दिवसाचा खेळ अद्याप बाकी आहे. हे पाहता दोन्ही संघांना कसोटीतील आपले पहिले जगज्जेतेतेपद पटकावण्याची समान संधी आहे.
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : ४६९.
भारत : पहिला डाव : २९६.
ऑस्ट्रेलिया : दुसरा डाव : ८४.३ षटकांत ८ बाद २७० धावांवर घोषित (ॲलेक्स कॅरी नाबाद ६६, मिचेल स्टार्क ४१, मार्नस लाबुशेन ४१, स्टीव्ह स्मिथ ३४, कॅमेरून ग्रीन २५, ट्रॅव्हीस हेड १८, उस्मान ख्वाजा १३, रवींद्र जडेजा ३/५८, मोहम्मद शमी २/३९, उमेश यादव २/५४, मोहम्मद सिराज १/८०).
भारत : दुसरा डाव : ७ षटकांत बिनबाद ४१ (रोहित शर्मा खेळत आहे २२, शुभमन गिल खेळत आहे १८).