संग्रहित छायाचित्र
बर्लिन: इंग्लंडच्या गुणवान संघाचा कडवा प्रतिकार २-१ अशा फरकाने मोडून काढत स्पेनच्या संघाने युरो चषक फुटबाॅल स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. याबरोबरच या स्पर्धेच्या विजेतेपदाचा चौकार लगावणारा स्पेन हा एकमेव संघ ठरला आहे.
बर्लिनच्या स्टेडियमवर रविवारी रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. मात्र, यात अखेर स्पेनने बाजी मारली. विजेत्या संघातर्फे निको विल्यम्स आणि मिकल ओयारझाबाल यांनी प्रत्येकी एक गोल केला. इंग्लंडतर्फे सामन्यातील एकमेव गोल कोल पाल्मरने केला. हे तिन्ही गोल सामन्याच्या उत्तरार्धात झाले.
युरो चषकाचा अंतिम सामना स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन सर्वोत्तम संघ स्पेन आणि इंग्लंड यांच्यात खेळवला गेला. दोन्ही संघांनी विजेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावले होते. यामध्ये अखेरीस स्पॅनिश संघाने २-१ने बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पेन आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यात जबरदस्त चढाओढ बघायला मिळाली. पूर्वार्धात दोन्ही संघांच्या आघाडीच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी गोलक्षेत्रात वारंवार हल्ले केले. मात्र, दोन्ही संघांची बचावफळी इतकी दक्ष होती की, ती भेदण्यात कोणालाच यश आले नाही. परिणामत: पूर्वार्धात दोन्ही संघ गोलशून्य फरकाने बरोबरीत होते.
उत्तरार्धात मात्र स्पेनच्या खेळाडूंनी आक्रमणाची धार वाढवली. याचा परिणाम म्हणून निको विल्यम्सने ४७व्या मिनिटाला इंग्लंडचा बचाव भेदत स्पेनला आघाडी मिळवून दिली. यानंतर इंग्लंडने बरोबरी साधण्याच्या इराद्याने खेळ केला. अखेर सामन्याच्या ७३व्या मिनिटाला पाल्मरने स्पेनच्या गोलरक्षकाला चुकवत जबरदस्त गोल केला आणि इंग्लंडला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
ही बरोबरी साधल्यावर इंग्लंडच्या आघाडीच्या खेळाडूंनी आपल्या संघासाठी विजयी गोल करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, स्पेनच्या बचावफळीने त्यांचे इरादे उधळून लावले. ८६व्या मिनिटाला स्पेनचा अनुभवी खेळाडू ओयारझाबालने गोल करून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी अखेर निर्णायक ठरली. ९० मिनिटांचा खेळ संपल्यानंतर अतिरिक्त वेळ म्हणून दिलेल्या ४ मिनिटांतही इंग्लंडचा संघ गोल करण्यात यशस्वी होऊ शकला नाही.
विजेतेपदाच्या चौकारासाठी एका तपाची प्रतीक्षा
यासह स्पेन ४ वेळा युरो कप जिंकणारा पहिला देश बनला आहे. मात्र, ही चौथी ट्रॉफी जिंकण्यासाठी त्यांना तब्बल १२ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. इतर कोणत्याही संघाने आतापर्यंत इतक्या वेळा युरो कप जिंकलेला नाही.
यापूर्वी, स्पेनने १९६४, २००८ आणि २०१२ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. १९६४च्या अंतिम फेरीत स्पेनने सोव्हिएत युनियनवर २-१ने मात केली होती. जर्मनीला एकमेव गोलच्या फरकाने नमवत स्पेनने २००८ मध्ये दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या चषकावर आपले नाव कोरले. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवताना २०१२ मध्येही स्पेनने विजेतेपद कायम राखले. त्या वेळी या संघाने इटलीला ४-० अशा गोलफरकाने पाणी पाजले होते.