हेजलवूडऐवजी स्कॉट बोलँड
#लंडन
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या जागतिक कसोटी भारत | अजिंक्यपद मालिकेच्या अंतिम लढतीला काही तास शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीतील हुकमी एक्का जोश हेजलवूड दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी स्कॉट बोलँड याला संधी मिळणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने मंगळवारी (दि. ६) याबाबत माहिती दिली. कसोटी जगज्जेतेपदासाठी दावेदार असलेल्या दोन्ही संघांना दुखापतीचा फटका बसला आहे. ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल हे भारतीय दिग्गज दुखापतीमुळे फायनलला मुकले आहेत. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडदेखील या लढतीला मुकणार आहे.
स्कॉट बोलैंड याने २०२१ मध्ये वयाच्या ३२ व्या वर्षी इंग्लंडविरुद्ध अशेस मालिकेदरम्यान कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर बोलँड सातत्याने कौतुकास्पद कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत ७ कसोटी सामन्यात १३.४२ च्या प्रभावी सरासरीने २८ बळी घेतले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्ण ताकदीने उतरेल. डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा सलामीला येण्याची शक्यता आहे. मार्नस लाबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असतील. ट्रेविस हेड, कॅमेरून ग्रीन आणि अॅलेक्स कॅरी मध्यक्रम सांभाळतील. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड यांच्यावर गोलंदाजीची धुरा असेल.
वृत्तसंस्था