बेकेनहॅम -इंग्लंड दौऱ्यात जबरदस्त फाॅर्मात असलेला गुणी फलंदाज सर्फराझ खानने इंट्रा स्क्वॉड सामन्यात शानदार आक्रमक शतक झळकावले. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग या प्रमुख गोलंदांची धुलाई करीत त्याने झळकावलेल्या १०१ धावांच्या स्फोटक खेळीमुळे रविवारी (दि. १५) भारत ‘अ’ने भारतीय संघाविरुद्ध ६ बाद २९९ धावा केल्या.
सर्फराझने इंग्लंडमध्ये आपली धडाकेबाज फलंदाजी कायम ठेवताना बेकेनहॅममध्ये सुरू असलेल्या इंट्रा-स्क्वॉड सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्य भारतीय कसोटी संघाविरुद्ध शानदार शतक झळकावले. या २७ वर्षीय फलंदाजाने फक्त ७६ चेंडूत १०१ धावांची स्फोटक खेळी केली. या शतकी खेळीदरम्यान सरफराजने २ गगनचुंबी षटकार आणि १५ चौकार मारले.
भारताचा प्रमुख गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराह आणि अर्शदीपसिंग यांच्यासाठी रविवारचा दिवस निराशाजनक ठरला. बुमराहने सात षटकांत ३६ धावा देऊनही त्याला एकदेखील विकेट घेता आली नाही. अर्शदीपने १२ षटके टाकताना ५२ धावा मोजल्या. मात्र त्याचीदेखील बळींची पाटी कोरीच राहिली. भारतीय संघातील गोलंदाजांपैकी मोहम्मद सिराज (२/८६) आणि प्रसिध कृष्णा (२/४१) हे यशस्वी ठरले. नितीशकुमार रेड्डीला एक विकेट घेण्यात यश आले.
या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाकडून कर्णधार शुबमन गिल आणि के. एल. राहुल यांनी अर्धशतके झळकावली होती. भारतीय संघाने पहिल्या डावात ४५९ धावा केल्या. त्याला उत्तर देताना सर्फराझने शतकी खेळी साकारली. दुसऱ्या दिवसअखेर भारत अ संघाचा स्कोअर ६ बाद २९९होता. दिवसअखेर इशान किशन ४५ तर अष्टपैलू शार्दुल ठाकूर १९ धावांवर खेळत होते. इतर खेळाडूंना फलंदाजीची संधी मिळावी, म्हणून सर्फराझ शतकी खेळीनंतर निवृत्त झाला. यापूर्वी त्याने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या अनधिकृत कसोटीत ९२ धावा केल्या होत्या.
-कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या संघात स्थान नाही
२० जूनपासून भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू होत आहे. यात पाच सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेसाठी सर्फराझला संघात स्थान देण्यात आलेले नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातदेखील सर्फराझ भारतीय संघाचा भाग नव्हता. त्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने पहिल्या सामन्यात दीडशतक झळकावले होते. मात्र, उर्वरित दोन सामन्यात तो फ्लाॅप ठरला. तेव्हापासून सर्फराझ संघाबाहेर आहे. सर्फराझने आतापर्यंत सहा सामन्यांत एक शतक आणि तीन अर्धशतकांसह ३७.१०च्या सरासरीने ३७१ धावा केल्या आहेत.
इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी बीसीसीआयने १८ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात सर्फराझचा समावेश करण्यात नाही. त्याला भारतीय अ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. आव्हानात्मक अशा इंग्लिश वातावरणात सलग दोन सामन्यांत अनुक्रमे ९२ आणि १०१ धावांची दमदार खेळी करीत सर्फराझने भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावा मजबूत केला आहे.
-ऋतुराज गायकवाड अपयशी
डावाच्या सुरुवातीला भारत अ संघाने दोन चेंडूंनंतर ऋतुराज गायकवाडची विकेट गमावली. ऋतुराज मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे झेल देऊ बाद झाला. तथापि, अभिमन्यू ईश्वरनने ३९ आणि साई सुदर्शनने ३८ धावा करीत भारत ‘अ’ला सावरले. हे दोघेही कसोटी संघाचा भाग आहेत.