सबालेन्का, मुचोवा उपांत्य फेरीत
#पॅरिस
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला गटामध्ये बेलारुसची आर्यना सबालेन्का आणि चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवा यांनी मंगळवारी (दि. ६) महिला गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सबालेन्काने युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाचे आव्हान सुमारे १ तास ४० मिनिटांच्या लढतीत ६-४, ६-४ असे परतवून लावले. मुचावानेही एवढ्याच वेळत उपांत्यपूर्व फेरीचा अडसर पार करताना रशियाच्या ॲनास्ताशिया पावलुचेन्कोवा हिच्यावर ७-५, ६-२ अशी मात केली.
उपांत्य फेरीत आता दुसरी मानांकित सबालेन्का आणि मुचोवा याच दोघी एकमेकींसमोर उभ्या ठाकणार आहेत. वर्षातील पहिली ग्रॅंडस्लॅम असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावून समालेन्काने यंदाच्या मोसमाचा प्रारंभ जोरात केला. या २५ वर्षीय खेळाडूने कारकिर्दीत प्रथमच उपांत्य फेरी गाठली आहे. यापूर्वी मागील सलग तीन वर्ष तिचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपले होते.
अव्वल मानांकित इगा स्वियाटेक हिला उपांत्य फेरी गाठण्यासाठी अमेरिकेची धोकादायक खेळाडू सहावी मानांकित काको गाॅफ हिचा अडथळा पार करावा लागेल. ही लढत तिने जिंकल्यास आणि उर्वरित उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अपसेट घडला नाही तर स्वियाटेक आणि ट्युनिशियाची ओन्स जाबेऊर यांच्यात उपांत्य फेरीची लढत होऊ शकते. सातव्या मानांकित जाबेऊरला १४ व्या मानांकित ब्राझीलच्या बीट्रीझ माईयाविरुद्ध खेळायचे आहे.
वृत्तसंस्था