रोहितला दुखापत, पण गंभीर नाही...

जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली आहे. नेटमध्ये सराव करताना रोहितच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. मात्र, दुखापत गंभीर नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 7 Jun 2023
  • 11:55 am
रोहितला दुखापत, पण गंभीर नाही...

रोहितला दुखापत, पण गंभीर नाही...

जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेचा अंतिम सामना आजपासून, एक दिवस आधी सरावादरम्यान डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला मार

#लंडन

जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली आहे. नेटमध्ये सराव करताना रोहितच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. मात्र, दुखापत गंभीर नाही.

सामन्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना रोहितने अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र, दुखापतीबाबत बोलायचे टाळले. ‘‘आम्ही कसोटीतील विजेतेपद पटकावण्याच्या इराद्यानेच ही लढत खेळणार आहोत. ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करण्यास संपूर्ण भारतीय संघ उत्सुक आहे.’’ बुधवारपासून (दि. ७) ही लढत होत आहे.

शर्मा म्हणाला की, मला खेळ आणि विजेतेपद जिंकायचे आहे. म्हणूनच आम्ही खेळतो. मात्र, या दरम्यान रोहित त्याच्या दुखापतीबद्दल बोलला नाही. WTC चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जून रोजी होणार आहे. हा सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाईल.

रोहित या आधी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषकादरम्यान जखमी झाला होता. ही दुखापत इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या दोन दिवस आधी सराव करताना झाली होती. त्यावेळी सुमारे दीडशे किलोमीटर वेगाने आलेला चेंडू त्याच्या मनगटावर आदळला होता. रोहित लगेचच मनगट धरून नेटमधून बाहेर पडला. सुमारे ४०  मिनिटांनी तो परतला आणि फलंदाजी केली. या दुखापतीनंतरही रोहित उपांत्य फेरीचा सामना खेळला आणि त्याने २७ धावांची खेळी केली. भारताने हा सामना १० विकेटने गमावला होता.

ऑस्ट्रेलिया आता भारताला हलक्यात घेत नाही : विराट

जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने भारताच्या यशाचा विश्वास व्यक्त केला. तो म्हणाला, ‘‘भारतीय कसोटी संघानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर दोनदा पराभूत करून दाखवलं आहे. त्यामुळे भारताची क्षमता जगाला कळली आहे. आता टीम इंडियाला टेस्ट टीम म्हणून कोणीच हलक्यात घेऊ शकत नाही.  जेव्हापासून आम्ही ऑस्ट्रेलियात दोनदा जिंकलो तेव्हापासून सर्वच प्रतिस्पर्धी भारतीय संघाचा आदर करू लागले. कसोटी संघ म्हणून आता ऑस्ट्रेलियासह कोणताही संघ भारताला हलक्यात घेत नाही. हा अंतिम सामना म्हणजे दोन तुल्यबळ संघांतील लढाई आहे. भारतीय संघाच्या यशाबाबत आम्हाला विश्वास आहे.’’या वर्षी मार्चमध्ये झालेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत केले. त्याचा मानसिक फायदा भारतीय संघाला मिळू शकतो. 

कसोटी ड्रॉ किंवा टाय झाल्यास संयुक्त विजेतेपद सामना अनिर्णित किंवा बरोबरीत संपल्यास, दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. अंतिम सामन्यासाठी एक दिवस राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे, पण खराब हवामानामुळे खेळावर परिणाम झाला आणि पाच दिवसांत त्याची भरपाई शक्य नसल्यास राखीव दिवसात सामना खेळवला जाईल. मागील वर्षी भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यात पहिला दिवस पावसाने पूर्णपणे वाहून गेला आणि सामना राखीव दिवशी गेला. यंदा मात्र, पावसाची शक्यता फारच कमी आहे. पहिले तीन दिवस आणि पाचवा दिवस स्वच्छ सूर्यप्रकाशाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, इंग्लंडमधील पाऊस हा बिनभरवशाचा असतो. तो कधीही येतो आणि वाट लाऊन जातो.

जूनमध्ये ओव्हलवर पहिल्यांदाच कसोटी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली गत उपविजेत्या भारतीय संघाने आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आपल्या नावे करण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी टीम इंडिया फायनलम‌ध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे आव्हान मोडून काढण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारपासून ही निर्णायक लढत सुरू होत आहे. विशेष म्हणजे, जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेच्या अंतिम सामन्याच्या रुपात ओव्हलवर जून महिन्यात प्रथमच कसोटी सामना खेळवण्यात येत आहे.  

ओव्हलवर २७ हजार ५०० चाहच्यांच्या साक्षीने कसोटीतील विश्वविजेतेपद पटकावण्याची संधी दोन्ही संघांना आहे. आतापर्यंतच्या १७८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच हे मैदान जूनमध्ये कसोटी सामन्याचे आयोजन करत आहे. येथे कसोटी सामने सामान्यत: इंग्रजी उन्हाळ्याच्या शेवटी म्हणजे सप्टेंबरपासून सुरू होतात.

ओव्हलचे मैदान फिरकीपटूंना मदत करते, पण कसोटी सामन्याच्या असामान्य वेळेमुळे थोडी अडचण निर्माण झाली आहे. जून महिन्यात होत असलेल्या या पहिल्यावहिल्या सामन्यात खेळपट्टी कशी ठरेल, हे सांगणे कठीण आहे. मैदानाच्या चारही सेंटर विकेट हिरव्या आहेत. त्यावर साहजिकच वेगवान गोलंदाजांना मदत मिळते.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest