सग्रहीत छायाचित्र
बंगळुरू : आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 58 व्या सामन्यात काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र पावसामुळे हा सामना नाणेफेक होण्यापूर्वीच रद्द करण्यात आला. रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी हा सामना रद्द करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सामना पावसामुळे रद्द होण्याची ही तिसरी वेळ ठरली.
सामना रद्द झाल्याने दोन्ही संघाना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. त्यामुळे आरसीबीच्या खात्यात 12 सामन्यानंतर 17 गुण झाले आहेत. मात्र त्यानंतरही आरसीबी प्लेऑफसाठी क्वालिफाय होऊ शकलेली नाही. तर दुसरीकङे केकेआरला प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी हा सामना जिंकणे जरूरीचे होते. मात्र पावसानं घात केला. केकेआरचं यासह 13 सामन्यांनंतर 12 गुण झाले असून यासह गतविजेत्या कोलकाताचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्ठात आलं आहे. केकेआर या 18 व्या मोसमातून बाहेर पडणारी चौथी टीम ठरली आहे.
कालचा सामना रद्द झाल्यामुळं बंगळुरु संघ 12 सामन्यात 17 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला. गुजरात टायटन्स 11 सामन्यात 16 गुणांसह आणि पंजाब किंग्ज 11 सामन्यात 15 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांचा अद्याप एक सामना बाकी आहे.
कोलकाता संघ, 13 सामन्यात 12 गुणांसह, आता स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्यांचा अंतिम साखळी सामना केवळ औपचारिकता असून आज दुपारी 3.30 वाजता जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज तर दुस-या लढतीत संध्याकाळी 7.30 वाजता मेजवान दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स अशा लढती होतील.