संग्रहित छायाचित्र....
Ranji Trophy 2025 : टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंची खराब कामगिरी अजूनही सुरूच आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्यासह अनेक भारतीय खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. पण यातही ते काही विशेष कामगिरी करू शकले नाही. यशस्वी आणि रोहित मुंबईकडून खेळत आहे तर ऋषभ पंत दिल्लीकडून खेळत आहे. यासह, रणजी सामन्यात भारताचे पाच स्टार खेळाडू असून ते स्वस्तात बाद झाले आहेत.
मुंबईचा सामना जम्मू-काश्मीर विरुद्ध आहे. गुरुवारपासून त्याची सुरुवात झाली. मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. संघाने अवघ्या 47 धावांवरच 7 विकेट गमावल्या होत्या. यादरम्यान, सलामीवीर यशस्वी फक्त 4 तर रोहित शर्मा 3 धावा करून बाद झाला. त्याचप्रमाणे श्रेयस अय्यरलाही काही विशेष कामगिरी करता आली नाही. तो 7 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. कर्णधार अजिंक्य रहाणेही अवघ्या 12 धावा करून माघारी परतला. तर अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेला तर खातेही उघडता आले नाही.
गिल आणि पंतही ठरले अपयशी...
ऋषभ पंत दिल्लीकडून खेळत आहे. दिल्ली आणि सौराष्ट्र यांच्यातील सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. दिल्लीकडून पहिल्या डावात पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या दरम्यान, तो फक्त 1 धाव करून बाद झाला. शुभमन गिल हा पंजाब संघाचा भाग आहे आणि तो कर्णधार देखील आहे. हा सामना पंजाब आणि कर्नाटक यांच्यात बंगळुरूमध्ये खेळला जात आहे. गिल फक्त 4 धावा करून बाद झाला. तो सलामीसाठी आला होता.
पाटीदार-व्यंकटेशही स्वस्तात बाद...
रजत पाटीदार आणि व्यंकटेश अय्यर मध्य प्रदेशकडून खेळत आहेत. मध्य प्रदेश आणि केरळ यांच्यात सामना सुरू आहे. यादरम्यान, मध्य प्रदेशचा निम्मा संघ 63 धावांवर माघारी परतला होता. यामध्ये पाटीदार खाते न उघडताच तर व्यंकटेश अय्यर केवळ 2 धावा काढून बाद झाला.