Ricky Ponting : दिल्लीच्या प्रशिक्षकपदाला पॉटिंगचा रामराम

आयपीएलचा १६ वा हंगाम दिल्ली कॅपिटल्ससाठी फारसा समाधानकारक ठरलेला नाही. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने दिल्लीचे नेतृत्व केले. मात्र दिल्लीला काही चांगली कामगिरी करता आली नाही. दिल्ली सध्या गुणतालिकेत ८ गुणांसह खालच्या क्रमांकावर आहे. त्यांचे अजून फक्त दोन सामने शिल्लक आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 18 May 2023
  • 02:37 pm
दिल्लीच्या प्रशिक्षकपदाला पॉटिंगचा रामराम

दिल्लीच्या प्रशिक्षकपदाला पॉटिंगचा रामराम

दिल्ली कॅपिटल्समध्ये बदलाचे वारे, मुख्य प्रशिक्षकपदासाठी 'दादा'चे नाव चर्चेत

#नवी दिल्ली

आयपीएलचा १६ वा हंगाम दिल्ली कॅपिटल्ससाठी फारसा समाधानकारक ठरलेला नाही. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने दिल्लीचे नेतृत्व केले. मात्र दिल्लीला काही चांगली कामगिरी करता आली नाही. दिल्ली सध्या गुणतालिकेत ८ गुणांसह खालच्या क्रमांकावर आहे. त्यांचे अजून फक्त दोन सामने शिल्लक आहेत.

दरम्यान, दिल्लीच्या खराब कामगिरीनंतर संघात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटिंग आपल्या पदावरून बाजूला होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर असे झाले तर दिल्लीचा नवा प्रशिक्षक कोण होऊ शकतो याचेही अंदाज बांधले जात आहेत. आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने या चर्चेत उडी घेत एका भारतीय दिग्गज खेळाडूचे नाव सुचवले आहे. इरफान पठाणला रिकी पॉटिंगनंतर रिक्त झालेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी सौरव गांगुली योग्य वाटतो आहे. कारण तो भारतीय खेळाडूंची मानसिकता चांगलीच ओळखतो.

इरफान पठाणने एका मुलाखतीत सांगितले की, दिल्लीच्या संघात सौरव गांगुलीची उपस्थिती ही खूप मोठी बाब आहे. मला असे वाटते की, दादाकडेच मुख्य प्रशिक्षकदाची जबाबदारी द्यावी. तो या संघात मोठा बदल घडवून आणू शकतो. भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेबद्दल सौरव गांगुलीला चांगले ज्ञान आहे. त्याला ड्रेसिंग रूम कसे चालवायचे हे माहिती आहे. दिल्लीने याचा नक्कीच फायदा उचलायला हवा.

कर्णधार वॉर्नरनेही याला दुजोरा दिला आहे. त्यांचा संघ पुढच्या हंगामाची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर संघात सौरव गांगुलीला नवी जबाबदारी देण्यात आली  तर नवल वाटायला नको. दिल्लीने यंदाच्या हंगामात त्यांच्या क्षमतेचा विचार करता फार सुमार कामगिरी केली आहे. ऋषभ पंत दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे संघाची धुरा डेव्हिड वॉर्नरच्या खांद्यावर देण्यात आली होती. मात्र त्याला संघाकडून उत्तम कामगिरी करून घेता आली नाही. त्याची स्वतःची कामगिरी देखील लौकिकास साजेसी राहिली नाही. ऋषभ पंत पुढच्या वर्षी दिल्लीच्या संघात परतेल आणि तोच संघाचे नेतृत्व करेल.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story