पंतप्रधानांच्या मौनाने दुखावले...
#पानिपत
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतक्या दिवसांपासून आमच्या प्रश्नावर मौन आहेत. त्यांच्या मौनामुळे मी दुखावले आहे, अशी निराश प्रतिक्रिया आशियाई चॅम्पियन आणि महिला मल्लांच्या लैंगिक छळासंदर्भातील आंदोलनाच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेल्या विनेश फोगटने व्यक्त केली.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार असलेले उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे बाहुबली नेते ब्रिजभूषण शरणसिंह यांच्यावर महिला मल्लांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. या विरोधात विनेश फोगट तसेच साक्षी मलिक आणि बजरंग पूनिया या ऑलिम्पिक पदकविजेत्यांनी महिला मल्लांवरील अन्यायाला वाचा फोडली असून हे तिघे या आंदोलनाचा मुख्य चेहरा आहेत. ‘‘मल्ल आपली व्यथा सांगण्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी बोलत असताना ते फोनवर व्यस्त होते. त्यांना मल्लांची चिंता ऐकण्यात रस नव्हता,’’ असा गंभीर आरोपदेखील विनेशने एका मुलाखतीत केला. १५ जूनपर्यंत ब्रिजभूषण यांच्यावर ठोस कारवाई न झाल्यास दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा यावेळी विनेशने दिला.
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलक मल्लांशी चर्चा केली होती. त्यात १५ जून रोजी या प्रकरणाचे आरोपपत्र सादर करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. जागतिक कुस्ती महासंघाने अल्टिमेटम दिलेला असल्यामुळे ३० जूनपर्यंत भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका घेणे आवश्यक आहे. ‘‘आता आम्ही आरोपपत्राची वाट पाहात आहोत. ब्रिजभूषण यांच्यावर ठोस कारवाई न झाल्यास त्याच दिवशी रात्री बैठक घेऊन दुसऱ्या दिवशीच्या आंदोलनाचा निर्णय घेऊन घोषणा करण्यात येईल. दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली नाही, तर रामलीला मैदान किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन सुरू केले जाईल.’’
वृत्तसंस्था