पार्किंगचा भुर्दंड टळणार, एमसीए'कडून प्रेक्षकांसाठी मोफत सुविधा
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर आता प्रेक्षकांसाठी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आता मोफत पार्किंगची व्यवस्था करून देण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी पार्किंगसाठीचा भुर्दंड टळणार आहे.
गहुंजे येथील स्टेडियमच्या परिसरात फक्त अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीआयपी) पार्किंगची व्यवस्था आहे. प्रेक्षकांना खासगी जागेत सुमारे पाचशे रुपये देऊन गाडी पार्क करावी लागत होती. याशिवाय तेवढे अंतर चालत जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले, एमसीएच्या वतीने यानंतर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यांसाठी प्रेक्षकांच्या वाहनांकरिता पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १५ हजार दुचाकींसाठी, तसेच सात हजार मोटारींसाठी विनामूल्य पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.पवार म्हणाले, प्रेक्षकांसाठी शक्य त्या सर्व सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असतो. तरीही काही त्रुटी राहून जाण्याची शक्यता असते. आम्ही प्रेक्षक आणि माध्यमांकडून स्टेडियमवरील सुविधा आणि त्रुटींबद्दल प्रतिक्रिया घेतल्या आणि त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न केले.
याआधीच्या सामन्यात प्रेक्षकांना पार्किंग मिळण्यात अनेक अडचणी आल्या होत्या. त्याचा विचार करून मोठ्या संख्येने सूचनाफलक आणि सुरक्षा रक्षकही नेमण्यात आले असल्याचे सांगून पवार म्हणाले, की सर्व सहकारी प्रायोजकांच्या सहकार्यामुळे सर्व प्रेक्षकांसाठी विनामूल्य पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आली आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना स्टेडियमवर नेण्या- आणण्यासाठी, तसेच त्यांच्या वृत्तांकनासाठा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय माध्यम प्रतिनिधींनीही स्टेडियमवरील सुविधांची प्रशंसा केली आहे.
आयसीसी अध्यक्ष ग्रेग बर्कले आणि भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन हे सुद्धा येथील सामन्याला हजर होते. त्यांनीही स्टेडियमवरील वातावरणाचा आनंद घेतला व एमसीएने केलेल्या व्यवस्थेची प्रशंसा केली, असे सांगून पवार म्हणाले, की यानंतर या स्टेडियमवर ८ नोव्हेंबर रोजी इंग्लंड विरुद्ध नेदरलँड, तर ११ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगला देश असे सामने होणार असून दोन्ही सामन्यांना प्रेक्षक प्रचंड संख्येने उपस्थित राहतील.