पाकिस्तानी संघाच्या हमीसाठी 'आयसीसी'चे अधिकारी लाहोरला रवाना
#नवी दिल्ली
एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तान संघाच्या भारत दौऱ्याची हमी घेण्यासाठी आयसीसीचे अधिकारी पाकिस्तानात पोहोचले आहेत. एकदिवसीय विश्वचषक ५ ऑक्टोबरपासून भारतात होणार आहे. आयसीसी अधिकाऱ्यांचा हा लाहोर दौरा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांच्या वक्तव्यानंतर आहे हे विशेष समजले जात आहे. जर टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात येणार नसेल, तर पाकिस्तानही विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही, असे 'पीसीबी'च्या अध्यक्षांनी म्हटले आहे. नजम सेठी यांच्या या वक्तव्यानंतर 'आयसीसी'चे अध्यक्ष ग्रेग बार्कले आणि सीईओ ज्योफ अलर्डिस लाहोरला गेले आहेत आणि त्यांना पीसीबीकडून वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यासाठी लेखी हमी हवी आहे.
विश्वचषकापूर्वी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानात आशिया चषक स्पर्धा होणार आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे भारताने आधीच स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत आशिया चषक तटस्थ ठिकाणी किंवा अन्य कुठल्यातरी देशात आयोजित करण्याची चर्चा आहे. मात्र, आशियाई क्रिकेट परिषदेकडून अद्याप कोणतेही स्पष्ट वक्तव्य आलेले नाही.
आयपीएल फायनलच्या वेळी अहमदाबादमध्ये एशियन कौन्सिलशी संबंधित श्रीलंका, अफगाणिस्तानचे अधिकारी उपस्थित होते. जिथे पाकिस्तानने प्रस्तावित केलेल्या हायब्रीड मॉडेलवरही चर्चा झाली.पीसीबीने आशिया चषकाचे चार सामने पाकिस्तानमध्ये आणि भारताचे सर्व सामने हायब्रिड मॉडेल अंतर्गत तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ज्याचे बीसीसीआयने समर्थन केले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीसीबीचे हे हायब्रीड मॉडेल सदस्य देशांनी (श्रीलंका आणि बांगलादेश) नाकारले होते. मात्र, आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) कोणतेही औपचारिक विधान केले नाही. त्याच वेळी, श्रीलंका क्रिकेट आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांनी आशिया कप स्पर्धा पाकिस्तानमधून (तटस्थ ठिकाण) हलवण्याच्या बाबतीत बीसीसीआयला पाठिंबा दिला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी ही चिंतेची बाब आहे की, जर हायब्रीड मॉडेल स्वीकारले गेले तर पीसीबी आयसीसीकडे विश्वचषकातील पाकिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी करू शकते. नजम सेठी यांनी आधीच सूचित केले आहे की, जर पाकिस्तान सरकारने सुरक्षेशी संबंधित कारणांमुळे संघ भारतात पाठवला नाही तर आयसीसी पाकिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित करण्यास सांगू शकते. आयसीसी आणि बीसीसीआय या दोघांनाही अशी परिस्थिती नको आहे.