NZ vs PAK T20 Series : पाकिस्‍तानची 'हाराकिरी' कायम, न्‍यूझीलंड विरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्‍यातही नामुष्‍कीजनक पराभव...

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना वेलिंग्टनमधील स्काय स्टेडियमवर झाला. या सामन्‍यात न्‍यूझीलंडने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 27 Mar 2025
  • 12:31 pm
Sport news, Cricket news,

NZ vs PAK T20 Series 2025

New Zealand vs Pakistan |  सलमान अली आगा यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली. तथापि, या मालिकेत पाकिस्तानला निराशा सहन करावी लागली. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना वेलिंग्टनमधील स्काय स्टेडियमवर २६ मार्च रोजी खेळवण्यात आला. या सामन्‍यात न्‍यूझीलंडने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवत टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली. 

वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, पाकिस्तानने २० षटकांत नऊ गडी गमावून १२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडने १० षटकांत दोन गडी गमावून १३१ धावा केल्या आणि सामना जिंकला. अखेरच्या सामन्‍यात पाच विकेट घेणाऱ्या जेम्स नीशमला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. तर मालिकेत तडाखेबाज फलंदाजी करणाऱ्या टिम सेफर्टला (२४९ धावा) मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.

टिम सेफर्ट ठरला विजयाचा नायक...

विजयासाठी १२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली. पहिल्या विकेटसाठी टिम सेफर्ट आणि फिन अॅलन यांनी ९३ धावांची भागीदारी केली. सुफियान मुकीमने उजव्या हाताच्या फलंदाज एलनला क्लिनबोल्ड केले आणि न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. तो १२ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. त्याच वेळी, टिम सेफर्टने ३८ चेंडूत ९७ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला विजयाकडे नेले. त्याच्याशिवाय, मार्क चॅपमन आणि डॅरिल मिशेल यांनी अनुक्रमे तीन आणि दोन* धावा केल्या. पाकिस्तानकडून सुफियानने दोन विकेट घेतल्या तर इतर गोलंदाज अपयशी ठरले.

जेम्स नीशमने केला कहर 

तत्पूर्वी ,पाकिस्तान संघ पुन्हा एकदा फलंदाजीने प्रभावित करण्यात अपयशी ठरला. त्यांच्याकडून कर्णधार सलमान आगाने ३९ चेंडूत सर्वाधिक ५१ धावा केल्या तर शादाब खानने २८ धावा केल्या. या दोघांमुळेच पाकिस्तान संघाला २० षटकांमध्‍ये नऊ विकेट गमावून १२८ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.

त्याच वेळी, पाच फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पाकिस्तानचे हसन नवाज, सुफियान मुकीम आणि मोहम्मद अली यांना खातेही उघडता आले नाही. सलामीवीर मोहम्मद हरिस ११ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. किवीजकडून जेम्स नीशमने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या तर जेकब डफीला दोन यश मिळाले. दरम्यान, बेन सीयर्स आणि ईश सोधी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Share this story

Latest