नोव्हाक जोकोविच तिसऱ्या फेरीत
#पॅरिस
गतविजेता नोव्हाक जोकोविच आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्कारेझ यांनी आपापले सामने जिंकून फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची (फ्रेंच ओपन) तिसरी फेरी गाठली आहे. फिलिप-चॅटियर कोर्टवर झालेल्या दुसऱ्या फेरीत जोकोविचने हंगेरीच्या मार्टन फुक्सोविकचा ७-६ (२), ६-०, ६-३ असा पराभव करून स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. जोकोविच आणि फुक्सोविच यांच्यातील पहिला सेट एक तास ३० मिनिटे चालला.
तत्पूर्वी, अल्कारेझने कोर्ट फिलिप-चॅटियरवर खेळत सलग तिसऱ्या वर्षी फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. सुरुवातीचा सेट जिंकल्यानंतर अव्वल मानांकित अल्कारेझने तारो डॅनियल्सविरुद्ध दुसऱ्या सेटमध्ये पराभव पत्करला. मात्र, २० वर्षीय खेळाडूने जपानच्या स्टारला ६-१, ३-६, ६-१, ६-२ असे
पराभूत केले.
दरम्यान, पाचव्या मानांकित ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपासने स्पेनच्या रॉबर्टो कार्बालेस बायनावर ६-३, ७-६, ६-२ असा विजय मिळवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. अन्य सामन्यात, रुनने अमेरिकेच्या ख्रिस्तोफर युबँक्सला ६-४, ३-६, ७-६ (७-२), ६-२ असे नमवले. फ्रिट्जने आपल्याच देशाच्या मायकल मोहला ६-२, ६-१, ६-१ असे सहज पराभूत केले. महिला गटात श्वीऑनटेकने स्पेनच्या क्रिस्टिना बुक्सावर ६-४, ६-० असे सरळ सेटमध्ये विजय मिळवला.तर, रायबाकिनाने चेक प्रजासत्ताकच्या ब्रेंडा फ्रुहविर्तोव्हाला ६-४, ६-२ अशा
फरकाने नमवले.